
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान केले. तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्यात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या शंकरराव कोल्हे यांच्या विचाराला सर्वोच्च प्राध्यान्य देऊ हीच त्यांच्या कार्याप्रती भारत सरकारच्यावतीने श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
डॉ. भागवत कराड शनिवारी रात्री कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येसगावी आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, प्रणव पवार, वेदांग मिलिंद कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ. प्राची पवार, अमृता पवार, मनाली कोल्हे, निकीता कोल्हे, रेणुका कोल्हे यांच्यासह ज्येष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. भागवत कराड म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील ग्रामीण अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमातून संजीवनी देत विकासाची फळे तुम्हा-आम्हाला चाखायला दिली. जिरायती भागात भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला प्राधान्य देऊन या भागात बंधार्याची जलसंजीवनी उभी केली. शेती आणि शेतकर्यांच्या प्रश्नांना वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्यात आणावे ही ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांची मागणी घेऊन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे माझ्याकडे आल्या होत्या, त्यांचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करू हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.