
कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने शेतकर्यांची बाजू घेऊन लढणारा, झगडणारा लढवय्या हरपला, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भारत सरकारच्यावतीने श्रद्धांजली वाहिली.
रावसाहेब दानवे हे शनिवारी रात्री कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन कण्यासाठी येसगावी आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, प्रणव पवार, वेदांग मिलिंद कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ. प्राची पवार, अमृता पवार, मनाली कोल्हे, निकीता कोल्हे, रेणुका कोल्हे यांच्यासह ज्येष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, शेतकर्याची मुलं म्हणून आम्ही तरुण वयात विधिमंडळात गेलो. शंकरराव कोल्हे 1990 मध्ये महसूल, परिवहन, कृषी, फलोत्पादन, सहकार, कमाल जमीन धारणा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम करत असताना आम्ही मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी त्यांच्याकडे जात असू. त्यावेळी ते सर्वप्रथम आमच्याशी शेती याच विषयावर बोलत व शेतकर्यांची क्रयशक्ती सुधारली पाहिजे यासाठी ते आमच्या सुचना जाणून घेत.
70 वर्षांत त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून केलेले काम राज्याला व देशाला लौकीकास्पद आहे. त्यांचा राज्य व देशपातळीवरील प्रत्येक प्रश्नांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे राजकारणातील स्थान अढळ आहे. जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांशी रावसाहेब दानवे यांनी यावेळी संवाद साधताना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्यांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीने घ्यावी आणि त्यांचा विचार पुढे न्यावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.