60 लाखांच्या जागेची परस्पर विक्री करून फसवणूक

कोतवालीत गुन्हा || पुतणीची चुलत्याविरूध्द फिर्याद
60 लाखांच्या जागेची परस्पर विक्री करून फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असताना देखील पुन्हा 60 लाख रुपये किंमतीच्या जागेची परस्पर विक्री केल्याप्रकरणी हबीब ईस्माईल राजकोटवाला (रा. ग्रेस टेरेस सोसायटी, कॅम्प, पुणे) याच्याविरूध्द भादंवि कलम 420, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पुतणी आफ्रीन अन्वर राजकोटवाला (रा. मोतीवालानगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

आफ्रीन यांनी फिर्यादी म्हटले आहे की, आमची केडगाव शिवारात वडीलोपार्जित सर्वे नं 247/1, 248/2, 248/3, 247/4 अ, 247/4/2 ही मिळकत आहे. वडील अन्वर इस्माईल राजकोटवाला हे सन 2009 मध्ये व आई आयिशा ही सन 2011 मध्ये मयत झाली आहे. वडिल हयातीत असताना सन 2008 मध्ये वाटणीपत्र दस्त क्र 2641/2008 प्रमाणे माझे वडिलांना वडीलोपार्जित प्रॉपर्टी आली होती. आम्ही (आफ्रीन, अमिराबानो, आक्सा व आफशा) चार बहिणी असतानाही चुलता हबीब राजकोटवाला याने 3 ऑक्टोबर, 2011 रोजी माझे नाव नमूद करून त्यांचे हस्ताक्षरात अर्ज लिहून व माझी बनावट सही करून सदर अर्ज हा केडगाव तलाठी यांना देवुन 7/12 सदरी फक्त माझे व आफशाच्या नावाची नोंद केली. अमिराबानो व अक्साची नोंद केली नाही. त्यानंतर मला व आफशा हीला हबीब राजकोटवाला यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, नगर येथे 17 जून, 2011 रोजी घेवून जावुन वडीलोपार्जित मिळकत आमचे नावे करून देतो म्हणुन माझे व आफशा हिचेकडुन मुख्त्यारपत्र दस्त क्र 3894/2011 प्रमाणे करून घेतला.

त्यांनतर तब्बल 10 वर्षाने त्या मुख्त्यार पत्राआधारे आमची केडगाव येथील वडीलोपार्जित मिळकत सर्वे नं 247/1, 248/2, 248/3, 247/4 अ, 247/41/2 ही मिळकत 11 फेब्रुवारी, 2021 रोजी खरेदीखत दस्त क्र 1006/2021 अन्वये खरेदी देऊन साद इलीयास मेमन यांना 60 लाख रूपये किंमतीला विक्री करून हबीब राजकोटवाला याने आमची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान हबीब राजकोटवाला, रेहान राजकोटवाला व सायरा राजकोटवाला यांनी फिर्यादी यांच्या वडिलांची टीन गल्ली गंजबाजार राहते घर ही मिळकत चुकीच्या बक्षीसपत्राद्वारे व सावेडी येथील जमीन ही चार बहिणी असतानाही फिर्यादी व आफशा अशा दोनच बहिणी अन्वर राजकोटवाला यांना वारस आहेत, असे हमीपत्र लिहुन घेवुन फिर्यादीच्या वडीलांची प्रॉपर्टी फिर्यादी व बहिणींच्या नावे करून देण्याचा बाहना करून त्याची विक्री केली आहे. बाबत त्यांचे विरूध्द न्यायालयाचे आदेशाने कोतवाली पोलीस ठाण्यात 269/2021 भादंवि कलम 420 इतर प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com