भुमी अभिलेख कार्यालयाने मोजणी नकाशे मापे टाकून द्यावेत

शेतकर्‍यांची मागणी
भुमी अभिलेख कार्यालयाने मोजणी नकाशे मापे टाकून द्यावेत

हनुमंतगाव (वार्ताहर) / Hanumantgaon - शेतकर्‍याला अनेक कारणामुळे आपल्या शेतीचे मोजणी करण्याची वेळ येते. तेव्हा भूमि अभिलेख कार्यालय मोजणी झाल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात नकाशा देताना त्यावर मोजमापे देत नाही. त्यामुळे शेतकर्‍याला नक्की काय मोजले याचा थांगपत्ता लागत नाही. इंग्रजांच्या नियमांचा फायदा घेत भूमी अभिलेख कार्यालय शेतकर्‍यांची पिळवणूक करत आहे.

अनेकदा रेकॉर्डप्रमाणे आपली शेती आहे का नाही? याची खात्री करणे, भावकीचे वाटप, शेजार्‍याने केलेले अतिक्रमण आदी कारणामुळे शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज करतो. भूमि अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी शेतकर्‍यासाठी शेतजमीन मोजून देतात परंतु यामध्ये सुस्पष्टता काही दिसून येत नाही. नवीन नियमाप्रमाणे एक हजार चौरस फुटाचा गुंठा तयार होतो त्यामुळे जुन्या आणि नव्या मापाचा पडताळा होत नाही.

पूर्वीच्या काळी शेतकर्‍यांमध्ये शिकण्याचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे या विभागाने दिलेल्या नकाशा प्रमाण धरून शेतकरी धन्यता मानीत असे. आजकाल मात्र या मोजणी करताना खूप चुका होताना आढळून येते. दिलेले नकाशे चुकीचे असतात. दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना अभ्यास करून अर्ज विनंत्या करण्याची पाळी येते. त्यामध्ये वर्षभराचा काळ निघून जातो. नकाशात चुकीच्या बाजू, अतिक्रमणाची चुकीची दिशा दाखवल्याचे पुरावे शेतकर्‍यांकडे आहेत.

दरम्यानच्या काळात आपण दिलेला नकाशा व दाखवलेले अतिक्रमण चुकीचे असल्याचे भुमी अभिलेख कबूल करतात. परंतु शेतकर्‍यांमध्ये कायमचे वाद निर्माण होतात. तसेच काही कर्मचारी आम्हाला काही अधिकार आहे. त्यामुळे अ‍ॅडजस्टमेंट करू शकतो असा प्रचार करतात आणि त्यातून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करतात. तरी शेतकर्‍यांना नकाशे देताना त्यावर मोजमापे टाकली तर शेतकरी स्वतः ते शेत केव्हाही मोजू शकतो. नकाशावर प्रमाण देऊन शेतकर्‍याला काही त्याबाबत खुलासा होत नाही. तरी याबाबत संबंधितांनी सुधारणा करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com