
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील भूखंडाची परस्पर खरेदी विक्री केल्याचे दाखवून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरु आहेर. अशा भू-माफीयांकडून नागरिकांना त्रास होत असून या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील मोरगे वस्ती, वॉर्ड नं. 7 येथील पुनम गणेश धुमाळ यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माझे सासरे नारायणराव भिकोबा धुमाळ यांनी मौजे दत्तनगर येथील जुना सर्व्हे नं. 102/1/1, नवीन सर्व्हे नं. 12/44, क्षेत्र 12 आर ही मिळकत बाबुराव कांबळे यांचेपासून दि. 29 जानेवारी 1965 रोजी कायम खरेदीने घेतेली असून तेव्हापासून या मिळकतीवर माझे सासरे यांचा ताबा व कब्जा आहे. ही मिळकत नारायणराव धुमाळ यांनी माझे नावे सब रजिस्ट्रार, श्रीरामपूर कार्यालात कायम खरेदीखत नोंदवून दिले असून त्याअन्वये माझे ताब्यात ही मिळकत दिली आहे. सदरच्या मिळकतीवर आजपर्यंत माझा ताबा आहे. त्यानंतर आपण या मिळकतीस काटेरी तारेचे कंपाऊंड केेले आहे.
परंतु काही लोकांनी या मिळकतीचे काटेरी कंपाऊंड जेसीबीद्वारे तोडून त्या प्लॉटमध्ये वाळू, खडी, मुरुम आणून टाकला. मी व पती गणेश नारायणराव धुमाळ यांनी त्यांना विनंती केली की, ही मिळकत आमची असून यावर तुम्हीं बांधकाम करु नका. असे सांगितले असता त्यांनी त्यांच्याकडील खरेदीखत दाखविले. माझ्या मालकीचा प्लॉट दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने खरेदीखत करुन दिले असल्याचे त्यात दर्शविले आहे. यामुळेे माझ्या प्लॉटचा कोणताही संबंध नसताना आपल्या कुटुंबावर अन्याय होत आहे.
या लोकांनी मला व पती गणेश धुमाळ यांना सुरुवातीला धक्काबक्की करुन शिवीगाळ केली. आम्हीं तेथून जात नसल्याने त्यांनी काठ्या लाठ्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यासह इतरांनी आमचे राहते घरीयेऊन मी व माझ्या सासुबाई तारामती नारायणराव धुमाळ यांना, तु किंवा तुझ्या कुटुंबातील कोणी व्यक्ती परत प्लॉटवर आल्यास त्याचे हातपाय काढून टाकू, वेळप्रसंगी जिवे मारण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी धमकी देवून शिवीगाळ केली. हे भू-माफियांपासून माझे व माझ्या कुटुंबियांचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला व माझे कुटुंबियास सरक्षण व न्याय मिळावा, अशी मागणी श्रीमती धुमाळ यांनी निवेदनात केली आहे.