जमिनीची खरेदी न देता 11 लाखांना गंडा

औरंगाबादच्या दोघांविरूध्द तोफखान्यात गुन्हा
जमिनीची खरेदी न देता 11 लाखांना गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

11 लाख रूपयांत सहा एकर जमिनीची खरेदी करून देतो, असे सांगून जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण रमेशचंद्र अजमेरा (वय 54 रा. प्रोफेसर चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. शेख अख्तर उस्मान (रा. नवाबपुरा, औरंगाबाद), कृष्णा शिंदे पाटील (रा. भक्तिनगर, सिडको, औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

प्रवीण अजमेरा व्यावसायिक असून त्यांची कृष्णा शिंदे पाटील याच्यासोबत ओळख होती. 25 जानेवारी, 2021 रोजी सकाळी शिंदे व शेख अजमेरा यांना त्यांच्या घरासमोर भेटले. शिंदे त्यांना म्हणाले,‘सय्यदपुरा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील गट नंबर 64 मधील सहा एकर जमीन 11 लाख रूपये किंमतीमध्ये विक्रीस आहे’. अजमेरा यांनी ती जमीन घेण्याचा निर्णय घेतला. अजमेरा यांनी 29 जानेवारी, 2021 रोजी त्यांच्या खात्यातून शेख यांच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे 11 लाख रूपये पाठविले होते. एक महिन्यात जमिनीचा व्यवहार करून देतो, असे शेख यांनी अजमेरा यांना सांगितले.

तसे त्यांनी नोटरी करून दिली होती. एक महिन्यात जमिनीचा व्यवहार करून न दिल्याने अजमेरा यांनी शेख यांच्याकडे 11 लाख रूपयांची मागणी केली. शेख यांनी अजमेरा यांना 30 जानेवारी, 2022 रोजी दोन चेक दिले. शेख यांनी ज्या बँक खात्याचे चेक दिले होते ते बँक खाते बंद असल्याने सदरचे चेक न वटल्याने परत आले. अजमेरा यांनी शेख व शिंदे यांच्याकडे 11 लाख रूपयांची वारंवार मागणी करून देखील त्यांनी पैसे न दिल्याने अजमेरा यांनी 14 एप्रिल, 2022 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

सदर प्रकरणी अधीक्षक पाटील यांनी चौकशी करून फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिल्याने सोमवार, 29 ऑगस्ट, 2022 रोजी अजमेरा यांच्या फिर्यादीवरून शेख अख्तर उस्मान व कृष्णा शिंदे पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com