भू-संपादन होईपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद करा

पिंपरी निर्मळच्या शेतकर्‍यांची मागणी
भू-संपादन होईपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद करा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

ब्रिटीश कालिन काँक्रीटचा सिंगल वे असलेला कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वांतत्र्यानंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. सध्या या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भूसंपादन न होताच हा रस्ता शेतकर्‍यांच्या शेतात घुसला आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर राष्द्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. दिवान यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. शासनाने नियमाप्रमाणे संपादन करून शेतकर्‍यांना जमिनीची भरपाई मिळेपर्यंत पिंपरी निर्मळ हद्दीत काम बंद ठेवावे, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे केली.

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्द्रीय महामार्ग योजनेतून चौ-पदरीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता ब्रिटीश काळात सुरुवातीला बारा फूट काँक्रीटचा होता. स्वातंत्र्यानंतर राज्य महामार्ग क्र. 10 नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. विभागाने या रस्त्याचे चौपदरीकरणाअंतर्गत मध्यापासून एका बाजुला साडेसात मिटर डांबरीकरण केले. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत करण्यात आला. एनएच-160 हा क्रमांक मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

सध्या या रस्त्याच्या मध्यापासून एकबाजुला 9 मीटर डांबरी व 15 मीटरपर्यंत साईड पट्टी एवढ्या हद्दीत काम करीत आहे. स्वांतत्र्यानंतरच्या काळात दर्जा व रूंदी वाढून या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन झाले नाही. आज काम करताना शेतकर्‍यांच्या हद्दीत काम करीत असल्याचे शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री.दिवान यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. शेतकर्‍यांचा महामार्गाच्या कामाला विरोध नाही. मात्र शासनाने जादा लागणार्‍या जमिनीचे भू-संपादन करून शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे राष्द्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. दिवान यांचेकडे केली.तसेच भू.संपादनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या भागातील काम बंद ठेवण्याची मागणी केली.

यावेळी राहाता तालुका असंघटीत काँगेसचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, गणेशचे संचालक सूर्यकांत निर्मळ, योगश निर्मळ, विठ्ठल निर्मळ, सोमेश्वर घोरपडे,भीमराज निर्मळ, गणेश निर्मळ, नवनाथ निर्मळ, यादव घोरपडे, अर्जुन निर्मळ, विठ्ठल घोरपडे, यमुना निर्मळ, सुमन निर्मळ, संदीप निर्मळ आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जगतिक बँक प्रकल्पाने राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटीकडे 30 मीटरचा रस्ता नकाशावर हस्तांतरित केला आहे. प्रत्यक्ष भू-संपादनाबाबत अद्याप कोणतीही कागदपत्रे मिळालेली नाहीत. याविषयी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून भू-संपादनाची माहिती मिळाल्यावर शेतकर्‍यांना अवगत करू.

- श्री. दिवाण, प्रकल्प अधिकारी राष्ट्रीय महामार्ग अ.नगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com