फर्‍या व लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा

जनार्दन घोगरे यांची मुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्र्यांकडे मागणी

संगहीत चित्र
संगहीत चित्र

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांवर असलेला फर्‍या व लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना होण्यासाठी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, आ. बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी अ.नगर यांनाही ई- मेल द्वारे पाठवल्याची माहिती घोगरे यांनी दिली.

या निवेदनात सरपंच घोगरे म्हणाले, जिल्ह्यात जनावरांवर मोठे संकट कोसळले असून फर्‍या व लम्पी रोगाने मोठे थैमान घातलेले आहे. या जनावरांवरील आजाराने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून चिंतेत आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा आमच्या लोणी खुर्द गावातील जनावरांचा बाजार फर्‍या व लम्पी रोगाच्या फैलावामुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

जनावरांवर आलेला फर्‍या व लम्पी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने लसीकरण होणे क्रमप्राप्त आहे. अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांमध्ये मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश शेतकर्‍यांचे संसार हे गाय, म्हैस यांच्या दूध व्यवसायावर आहेत. जर या आजाराचे थैमान रोखले नाही तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार असून ही परिस्थिती गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.

तरी जनावरांवर असलेल्या फर्‍या व लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तात्काळ लसीकरणासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्या.ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांवर फर्‍या व लम्पी आजाराने ग्रस्त आहे त्यांना शासनामार्फत औषधोपचार करावेत तसेज ज्या शेतकर्‍यांची जनावरे फर्‍या व लम्पी रोगाने दगावलेली आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच जनार्दन घोगरे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com