सात तालुक्यात लम्पीचा शिरकाव

50 जनावरे बाधित || 37 हजार जनावरांचे लसीकरण सुरू
सात तालुक्यात लम्पीचा शिरकाव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुरूवातीला अकोले आणि श्रीरामपूर तालुक्यातील जनावरांना लागण झालेल्या लम्पी स्किनचा शिरकाव आता सात तालुक्यांत झाला आहे. विशेष म्हणजे हे सातपैकी पाच तालुके उत्तरेतील आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने तातडीने या परिसरातील 37 हजार जनावरांची लसीकरण मोहीम हाती घेतली असून, त्यातील 18 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाने दिली.

लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रील्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. मागील वर्षीही जिल्ह्यात या रोगाने प्रवेश केला होता. 15 दिवसांपासून अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, कर्जत, संगमनेर, पारनेर या सात तालुक्यांत लम्पीची लक्षणे संकरीत गायांमध्ये आढळली. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तपासणी करून नमुने पाठवली असता 50 जनावरे बाधित असल्याचे समोर आले आहे.

यात सर्वाधिक 15 जनावरे अकोले, 12 राहुरी, तर संगमनेर तालुक्यातील 10 जनावरांचा समावेश आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने बाधित आढळलेल्या ठिकाणापासून 5 किलोमीटर परिघात जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. या परिसरात गायी व म्हशी मिळून 37 हजार 638 जनावरे असून त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. रविवारपर्यंत 17 हजार 675 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

पशूसंवर्धन विभागाने ज्या भागात लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत, तेथील जनावरांची वाहतूक बंद केली आहे. तसेच त्यात्या परिसरातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, या आजाराचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड) होतो. त्यामुळे गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी. गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. त्यांना चारा-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी. लक्षणे आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन डॉक्टरांना कळवावे. इतर जनावरांचे लसीकरण करावे, असे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

...................

.....................

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथून काही शेतकर्‍यांनी जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी सोमवारी तातडीने रवाना झाले. तपासणी करून या परिसरातील पाच किलोमीटर भागातील जनावरांचे लसीकरण केले जाणार आहे.

अशी आहेत बाधित जनावरे

अकोल (गर्दणी 15), श्रीरामपूर (बेलापूर 6, टाकळीभान 1), नेवासा (देवसडे 4), राहुरी (लांडेगाव 12), कर्जत (राशीन 2), संगमनेर (सादरपूर 10).

लम्पी आजाराची लक्षणे

या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषत: डोके, मान, पाय, कास या ठिकाणी गाठी येतात, तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यामध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.

लम्पी स्किन आजाराला शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. सर्वत्र तातडीने लसीकरण सुरू केलेले आहे. लक्षणे आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. तसेच गोठ्यात फवारणी करण्यासह स्वच्छता ठेवावी.

- डॉ. संजय कुमकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com