हळदी कार्यक्रमातून दागिण्यांसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास

पोखर्डी शिवारातील लॉन्समध्ये घडली घटना
हळदी कार्यक्रमातून दागिण्यांसह साडेचार लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री लॉन्समध्ये हळदी कार्यक्रम सुरू असताना तीन लाख रूपये किंमतीचे सोने व दीड लाख रूपये रोख रक्कम, असा चार लाख 50 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. नगर-औरंगाबाद महामार्गावरील एन. आर. लॉन्स (पोखर्डी, ता. नगर) येथे सोमवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी व्यापारी महादेव भिमराज खेडकर (वय 67 रा. खरवंडी कासार ता. पाथर्डी) यांनी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांच्या घरातील व्यक्तीचा विवाह सोहळा एन. आर. लॉन्स येथे मंगळवारी आयोजित केला होता. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रमासाठी ते लॉन्समध्ये दाखल झाले होते. यावेळी चोरट्यांनी डाव साधला. पांढर्‍या रंगाची पर्स चोरट्यांनी चोरली. या पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा साडे चार लाख रूपये किंमतीचा ऐवज होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार थोरवे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com