लाख-टाकळीमिया-राहुरी रस्ता गेला खड्ड्यात

दुरूस्तीकडे संबंधित लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
लाख-टाकळीमिया-राहुरी रस्ता गेला खड्ड्यात

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील लाख- टाकळीमिया-राहुरी या रस्त्याची अत्यंत दयनश्रय अवस्था झाली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून या रस्त्यामुळे 5 ते 6जणांचे बळी गेले आहेत. अजून किती बळी जाण्याची वाट या भागातील राजकीय नेते पहाणार आहेत? असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. अनेकवेळा हा रस्ता दुरूस्तीची मागणी होऊनही याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने तिव्र संताप व्यक्त होत आहे.

लाख-टाकळीमिया-राहुरी हा रस्ता राहुरी तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील 15 ते 16 गावच्या लोकांना राहुरी व दक्षिण महाराष्ट्रात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. शेतकरी आपला माल मार्केटमध्ये घेऊन येतात. मुले दररोज शाळा-कॉलेजला जातात. अनेकजण नोकरी-व्यवसायासाठी या रस्त्याने प्रवास करतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून साईडपटट्यांना मोठ्या कपारी पडल्या आहेत. दोन्ही बाजूंनी वाहने आल्यास रस्त्याच्या खाली वाहन घ्यावे लागते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होते व अपघात होण्याची शक्यता असते. रात्री वाहनचालकाला साईडपटट्यांचा अंदाज न आल्याने अपघात होऊन आतापर्यंत 5 ते 6 जणांचे बळी गेले आहेत.

राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर विधानसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघाला जोडली आहेत. या 32 गावांपैकी 15 ते 16 गावातील लोकांना दररोज राहुरीला जावे लागते. या गावातील लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने या मतदारसंघाचे आमदार लहु कानडे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अनेकवेळा या रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव मांडला. मात्र, आ. कानडे यांनी टाकळीमिया ते वाघाचा आखाडा शिवापर्यंतचा 2 किमी रस्ता दुरूस्त केला. येथून पुढील 6 किमी रस्ता दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे व राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात येतो. मात्र, तनपुरे यांनी त्यांच्या निधीतून टाकळीमिया शिवेपासून वाघाचा आखाड्याच्या पुढे 2 किमी रस्त्ता दुरूस्त केला. मात्र, पुढील राहुरी स्टेशन रस्त्यापर्यंतचा 4 किमी रस्ता अजूनही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची प्रतिक्षा लोकांना आहे.

तर लाख-टाकळीमिया या 6 किमी रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून तरी लाख-टाकळीमिया-राहुरी या रस्त्याचे दोन्ही बाजूंच्या साईडपटट्या व पक्के डांबरीकरण होणे गरजेचे आहे. अनेकवेळा मागणी करूनही संबंधित राजकीय नेते जाणूनबुजून दर्लक्ष करतात की काय? असा प्रश्न याभागातील लोकांना पडला आहे. हा रस्ता तातडीने डांबरीकरण करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com