लहुजी शक्ती सेनेने हरेगाव फाटा येथे रस्त्यावरच केली सत्यनारायण महापूजा

नेवासा रोडवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचा केला निषेध
लहुजी शक्ती सेनेने हरेगाव फाटा येथे रस्त्यावरच  केली सत्यनारायण महापूजा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नेवासा श्रीरामपूर रोडवर पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करून आबालवृद्धांचे होणारे हाल तात्काळ थांबवा या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु अनेक महिन्यांपासून सदरच्या रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्याने त्या निषेधार्थ सत्यनारायण महापूजा करून मंगळवारी नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुलकर्णी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून चार दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नेवासा रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सा. बां. उपविभाग श्रीरामपूर या कार्यालयाचे अखत्यारित असलेल्या श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाणपूल ते हरेगाव फाटा या रस्त्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हरेगाव फाटा अशोकनगर पोलीस चौकीसमोरील खड्ड्यामध्ये सत्यनारायण पूजा करून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे संबंधित विभागाला निवेदन देऊन कळविले होते. त्यानुसार लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी अनेकांनी रस्त्याच्या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्ष पणामुळे तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्यात येईल, असे आंदोलकांना लेखी दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात लहुजी शक्ती सेनाचे तालुका अध्यक्ष सागर भोंडगे उपाध्यक्ष राजेश रणवरे, संजय सकट, रवींद्र ससाणे, सुरेश दोडके, रोहन नवगिरे, अजय खंदारे व लहुजी शक्ती सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्तारोको प्रसंगी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी.आय.पाटील, किशोर जाधव, राजेंद्र मेहेर व ट्रॉफीक पोलीस राजगुरू, विजय शेलार यांनी प्रशासकीय सहकार्य केले. उपस्थितांचे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.