लाडगाव सरपंचाच्या मनमानीविरोधात ग्रामपंचायतीचे सदस्य एकवटले

गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल
लाडगाव सरपंचाच्या मनमानीविरोधात ग्रामपंचायतीचे सदस्य एकवटले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील लाडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात पार पडली. सुमारे 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वसाधारण गटातील रजिया पटेल यांची निवड करण्यात आली. मात्र कार्यालयात सतत गैरहजर राहणे, नागरिकांचे प्रश्न डावलणे, सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीचा कारभार करणे याला कंटाळून अखेर निर्वाचित 6 पैकी 5 सदस्यांनी सरपंचाविरोधात अविश्वास असल्याची तक्रार गटविकास अधिकार्‍यांकडे दाखल केली आहे.

याबाबत गटविकास अधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, विद्यमान सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. मासिक बैठकीदरम्यान वेळोवेळी ही योजना पूर्णत्वास आणण्याकामी विचारणा केली. सूचना व मागणी करून देखील सरपंचांनी टाळाटाळ केली आहे. सरपंचाच्या या निष्क्रीयतेमुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे.

विद्यमान सरपंचाकडून ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार, शासकीय अनुदाने व ग्रामपंचायत निधीची माहिती दिली जात नाही. सदस्य व नागरिक यांच्याशी सुसंवाद नाही. शिवाय भाषा सौजन्याची नाही. कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यात कसूर व हयगय केली जाते. मासिक सभा वेळेवर घेत नाहीत. त्यामुळे गावचा विकास पूर्णपणे खोळंबला असून विकास कामे पार पाडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या कारणामुळे विद्यमान सरपंचावर विश्वास राहिला नसल्याचे स्पष्ट करीत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभुमीवर लाडगाव येथे ग्रामविकास आघाडीची स्थापना झालेली असून त्यात विद्यमान उपसरपंच विमल थोरे या दाखल झाल्याने आघाडीची सदस्य संख्या 4 झाली आहे. आता एकूण 7 पैकी 4 सदस्य संख्या झाल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराचे सुकाणू ग्रामविकास आघाडीच्या हाती आल्याची चर्चा आहे.

गटविकास अधिकार्‍यांच्यावतीने पंचायतसमितीचे कक्ष अधिकारी चिमाजी गोडे यांनी सदरची तक्रार स्वीकारली. या तक्रारअर्जावर उपसरपंचासह विद्यमान सदस्य संदीप चोरगे, संगीता भांड, उत्तम भालेराव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. सदर तक्रार दाखल करताना गावातील प्रमुख कार्यकर्ते दत्तात्रय भांड, सोमनाथ भांड, राजेंद्र भांड, सोमनाथ थोरे, जमशेद पटेल, हरिभाऊ चौधरी, सिकंदर शेख, आबासाहेब भांड, सखाराम भालेराव, मुन्ना शेख, गणपत भालेराव, प्रकाश भांड, मच्छिंद्र थोरे, आदिनाथ भांड, अशोक भांड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com