नगरच्या मजूर अड्ड्यावर पहिल्यांदाच उभी राहणार श्रमिकांची संघटना

‘निर्माण मजदूर’च्या माध्यमातून बांधकाम कामगार एकवटणार
नगरच्या मजूर अड्ड्यावर पहिल्यांदाच उभी राहणार श्रमिकांची संघटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात अनेक वर्षांपासून असलेल्या मजूर अड्ड्यावरील (तुरुंग) बांधकाम कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, होणारा अन्याय थांबावा, कुटुंबाचे विविध प्रश्न सुटावेत, कामाला सुरक्षितता प्राप्त होण्याच्या उद्देशाने संघटित होण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे विविध प्रश्न सुटण्यासाठी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या निर्माण मजदूर संघटनेच्या माध्यमातून मजूर अड्ड्यावरील बांधकाम कामगार एकवटणार आहेत.

सकाळी मजूर अड्ड्यावर यायचे, काम देण्यासाठी आलेल्या व्यक्तींबरोबर जायचे, संध्याकाळी काम झाल्यावर घरी निघून जायचे, अशा दिनक्रमात अडकलेले अनेक श्रमिक कामगार आपल्या हक्कापासून वंचित आहेत. त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळण्यासाठी त्यांच्या मधीलच कामगारांना प्रतिनिधित्व देऊन ही संघटना उभी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.24) सकाळी जुनी महापालिका परिसरातील मजूर अड्डा येथे निर्माण मजदूर संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकांत पथारिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

पथारिया यांनी शहराच्या मजूर अड्ड्यावरील श्रमिक कामगारांच्या विविध प्रश्नांवर थेट कामगारांशी चर्चा केली. यावेळी राज्यसचिव रमेश आडबल्ले, उत्तम भिंगारदिवे, सुनील साळवे, सुभाष साठे, रमेश निकाळजे, किशोर साळवे, सोमनाथ जगधने, भगवान नेटके, अशोक चव्हाण, भगवान भुरभुरे, नागेश भिंगारदिवे, राणी मानकर, मीरा पवार, सुनीता धनवडे आदी कामगार वर्ग उपस्थित होते.

प्रास्ताविकात उत्तम भिंगारदिवे यांनी केले. यावेळी पथारिया म्हणाले, श्रमिक कामगारांची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी पुढे येत नसेल, तर श्रमिक बांधकाम कामगारांनी स्वतः संघटित होण्याची गरज आहे. मजूर अड्ड्यावरील असलेला विस्कळीतपणा, असंघटितपणा संघटनेच्या माध्यमातून दूर होणार आहे. बिनभरोश्याच्या अड्ड्यावरील कामगारांना विश्वास देण्याचे काम संघटना करणार आहे. एकमेकांचे त्रास,दुःख समजावून घेणारे या संघटनेचे श्रमिक कामगारच त्यांच्या बांधवांना न्याय देऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रमेश अडबल्ले म्हणाले, 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र नोंदणीकृत ठेकेदाराकडून मिळत नसल्याने अनेक कामगारांची शासनदरबारी नोंद झालेली नाही. त्यामुळे ते शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. हे प्रमाणपत्र महापालिकेने बांधकाम कामगारांना उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी संघटनेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी शनी चौकात व सध्या जुनी महापालिका समोरील चौकात दररोज सकाळी भरणार्‍या मजूर अड्ड्यावरील अनेक बांधकांम कामगारांची शासन दरबारी नोंद नाही. त्यांची नोंद होऊन शासनाकडून मिळणारे फायदे व लाभ मिळण्यासाठी निर्माण मजदूर संघटनेने पुढाकार घेतला असून, नगर शहरात पहिल्यांदाच मजूर अड्ड्यावरील श्रमिकांची संघटना उभी राहत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com