
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतमजूर, साखर कामगार, अंगणवाडी सेविका, वन कामगार, कोतवाल, मैल कामगार, औद्योगिक कामगार, नगर पालिका कामगार अशा अनेक कामगारांचे नेतृत्व करताना त्यांना न्याय मिळवून देणारे येथील ज्येष्ठ कामगार नेते अॅड. सुरेश मारुती गवळी (वय 74, रा.शिवाजी हौसिंग सोसायटी, आनंदधाम शेजारी, नगर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि. 25) सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दीडच्या सुमारास येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील मूळ रहिवासी होते.
दहा-बारा वर्षांपूर्वी अॅड. गवळी यांचे मेंदूचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे ते आजारीच होते व घरीच होते. या आजारपणातून बरे वाटल्यावर ते फोनवर अनेकांशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यायचे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांत त्यांची तब्येत खालावली होती व सोमवारी सकाळी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. डाव्या विचारांच्या कामगारांच्या विविध संघटना बांधणीत त्यांचा पुढाकार होता. लाल निशाण पक्षाचे (महाराष्ट्र) काम करताना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता.
नगर महाविद्यालयात शिक्षण घेताना गवळी हे विद्यार्थी संघटनेत जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. त्यानंतर लाल निशाण पक्षाचे काम त्यांनी सुरू केले. कामगार संघटनांमध्ये तब्बल 55 वर्षे त्यांनी काम केले. 1989 मध्ये लालनिशाण पक्ष फुटल्यावर लालनिशाण (महाराष्ट्र) या संघटनेत राज्य सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. देशातील जातीयवादी भाजप-आरएसएस यांच्याविरोधातील धर्मनिरपेक्ष काँग्रेस समवेत काम करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. मुंबईचे ज्येष्ठ गिरणी कामगार नेते यशवंत चव्हाण, जीवनराव सावंत, संतराम पाटील यांच्या समवेत त्यांनी काम केले.
मार्क्सवादी तत्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. यावर त्यांनी विपुल लेखन केले. या विषयावरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. लालनिशाण (महाराष्ट्र) पक्षाच्या नवे पर्व पाक्षिकाच्या संपादक मंडळात ते होते. यात राजकीय व आर्थिक विषयांवर विपुल लेखन त्यांनी केले. वाचनाचा दांडगा व्यासंग असल्याने साखर व्यवसाय, शेती व्यवसाय व पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास त्यांचा होता. साखर कामगारांचे द्विपक्षीय करार, पाण्याचे समन्यायी वाटप यात त्यांचा पुढाकार होता. अंगणवाडी सेविकांचे राज्यव्यापी संघटन उभारून त्यांचे प्रश्न तीव्रतेने मांडल्याने त्यांना नोकरीची शाश्वती मिळण्यात अॅड. गवळी यांचा सिंहाचा वाटा आहे.