कुरणमध्ये संतप्त जमावाकडून ग्रामसेवकाला मारहाण; पोलिसांशी हुज्जत, 9 जणांविरुद्ध गुन्हा

कुरणमध्ये संतप्त जमावाकडून ग्रामसेवकाला मारहाण; पोलिसांशी हुज्जत, 9 जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- तालुक्यात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या गावात मुंबईहून आलेल्या काही नागरिकांनी ग्रामसेवक गंगाधर राऊत यांना काल दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पुन्हा शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शिवीगाळ करणार्‍या ग्रामस्थांना अटक करण्यास आलेल्या पोलिस अधिकार्‍यांशीही या जमावाने हुज्जत घालत पोलीस गाडी अडवली. पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी 9 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. यामुळे प्रशासनाचे या गावाकडे अधिक लक्ष आहे. दिनांक 11 जून रोजी जाकीर समशेद शेख व त्याचे कुटुंबीय घाटकोपर, मुंबई येथून कुरण येथे वास्तव्यास आले होते. प्रशासनाला ही माहिती समजताच 22 जणांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. जाकीर शेख याला त्याचा राग आला. त्याने 24 जून रोजी ग्रामसेवक राऊत यांना मोबाईल वरून शिवीगाळ केली होती. त्यावेळी राऊत यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काल दुपारी जाकीर यांनी पुन्हा ग्रामसेवक राऊत यांना मोबाईल वरून धमकी दिली. माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून त्याची पेपरला खोटी प्रसिद्धी करतो का ? मी घाटकोपरचा असून तुझ्याकडे पाहून घेईल, अशी धमकी जाकीर याने ग्रामसेवक राऊत यांना दिली. राऊत हे साडेचार वाजेच्या सुमारास ग्रामपंचायती समोरील चौकात उभे असताना जाकीर व इतर काहीजण तेथे आले त्यांनी ग्रामसेवकांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

यानंतर राऊत यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात फोन करून घडलेला प्रकार कळविला. पोलीस निरीक्षक अभय परमार हे आपल्या सहकार्यांसह त्वरित कुरण येथे पोहोचले. पोलिसांनी जाकीर शेख यांच्यासह 9 जणांना ताब्यात घेऊन पोलिस गाडीत बसविले यावेळी तेथे जमाव एकत्र आला. या ग्रामस्थांना घेऊन जाऊ नये असे सांगून त्यांनी पोलिसांसोबत बराच वेळ हुज्जत घातली. जमावाने पोलीस गाडीही अडवली होती. ही हुज्जत चालू असताना जाकीर यांचा दोघा चुलत भावांनी गर्दीचा फायदा घेऊन त्याला पोलीस गाडीतून बाहेर काढून घेऊन गेले नंतर पोलिसांनी तिघांना पोलिस ठाण्यात आणले.

याबाबत ग्रामसेवक राऊत यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी जाकिर समशेर शेख, जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शादाब जाकिर शेख, अर्सलान जाकिर शेख, शाहिन जाकिर शेख, यास्मिन समशेर शेख, वसीम समशेर शेख, कय्युम मह्हमद हुसेन शेख सर्व राहणार घाटकोपर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1017/2020 भादवि कलम 353,341,143,147, 323, 504, 506, 269, 188 महाराष्ट्र कोव्हिड 19 विनियमन 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परदेशी हे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com