कुकडी भूसंपादनासाठी महसूलमंत्र्यांकडे बैठक

आ. रोहित पवार, खा. विखे यांचा पुढाकार
कुकडी भूसंपादनासाठी महसूलमंत्र्यांकडे बैठक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार प्रा. राम शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुकडी कालव्यासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळालेला नाही. भूसंपादनाचा मोबदला देताना वेगवेगळ्या कार्यालयात असलेले प्रस्ताव एकत्रित करणे, शेतकर्‍यांची संमती मिळवणे, शोध अहवाल घेणे, जिल्हा मूल्यांकन समितीकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव सादर करणे, पंचनामा, खरेदीखत अशी अत्यंत क्लिष्ट प्रक्रीया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया सुलभ करुन शेतकर्‍यांना तातडीने भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी मागील आठवड्यात आ. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानुसार आज महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होऊन भूसंपादनाचा मोबदला देताना येणार्‍या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा झाली. तसेच हा विषय सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कुकडी कालवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु कुकडीच्या भूसंपादनाचा विषय मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कुकडी कालव्यासाठी शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीचे भूसंपादन केले परंतु अनेक वर्षे या भूसंपादनाचा मोबदला शेतकर्‍यांना मिळालेला नाही. आ. रोहित पवार यांनी याबाबत सातत्याने जलसंपदामंत्री आणि अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वेगवेगळ्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत सातत्याते बैठका घेऊन भूसंपादनातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

कुकडी कालव्यामुळे लाखो शेतकर्‍यांना फायदा झाला असला तरी त्याचा मोबदला मात्र त्यांना वर्षानुवर्षे मिळालेला नाही. आपण महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून तब्बल 95 कोटी रुपयांचा मोबदला शेतकर्‍यांना मिळवून दिला. उर्वरित शेतकर्‍यांनाही मोबदला मिळवून देण्यासाठीही या सरकारकडं माझे प्रयत्न सुरू आहेत. खासदार सुजय विखे-पाटील यांनीही ही बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मंत्रिमहोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com