प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभारणीस महिनाभरात सुरूवात - लंघे

करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय आढावा बैठक
प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभारणीस महिनाभरात सुरूवात   - लंघे

नेवासा (तालुका प्रतिनिधी) -

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्राची

सुसज्ज इमारत कुकाण्यात उभी राहणार आहे. त्यासाठी या महिनाभरात कामासही सुरूवात होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठठलराव लंघे यांनी दिली.

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्ण कल्याण समितीची करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय आढावा बैठक आरोग्य केंद्राच्या आवारात शुक्रवार दि. 9 रोजी सकाळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रारंभी कुकाणा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर शिंदे व डॉ. भाग्यश्री सारूक-किर्तने यांचा उत्कृष्ट कामाबददल सत्कार करण्यात आला.

विठ्ठलराव लंघे पुढे म्हणाले, कुकाणा परिसर सतत गजबजलेला व मध्यवर्ती भाग आहे. येथील आरोग्य केंद्राची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने अत्याधुनिक नव्या बांधकामाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्रीताई घुले व माजी अध्यक्ष शालीनीताई विखे यांचेकडे मी नवीन इमारत बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीही यासाठी सहकार्य केल्याने मोठा निधी मिळवता आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ.रामेश्वर शिंदे यांनी कुकाणा केंद्राचा आढावा सादर केला.कुकाणा केंद्रात आजअखेर 309 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तसेच त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.कुकाण्यात सर्वाधिक 102 तर भेंडयात 71 रूग्ण आढळले आहेत. या परिसरात मलेरिया वा डेंगूची साथ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य सेवक अशोक गर्जे यांनी आभार मानले. बैैठकीस रूग्ण कल्याण समिती सदस्य अपूर्वा गर्जे, डॉ. शुभांगी देशमुख, माजी सरपंच छाया गोर्डे, माजी सरपंच दौलतराव देशमुख, सुनिता गरड, माजी पंचायत समिती सदस्य शंकर भारस्कर, कारभारी गोर्डे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com