गत वर्षीच्या तुलनेत यंदा कुकडीत तिप्पट साठा

घोड धरणात 67 टक्के पाणीसाठा
File Photo
File Photo

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे धरणांत गत वर्षी याच काळात केवळ 5554 दलघफू (18.50 टक्के) पाणीसाठा होता. पण यंदा 15835 दलघफू (53 टक्के) पाणीसाठा आहे.

पाणलोटात पावसाचा जोर कमी आहे. पण अधूनमधून कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍यातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 1029 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

येडगाव धरणात 93.38, माणिकडोह 46, वडज 72, पिंपळगाव जोगे 44, डिंभे 54.52 टक्के भरले आहे. आठ दिवसांत या प्रकल्पात सुमारे 15000 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

घोड धरणात 67 टक्के पाणीसाठा

कुकडी धरण साखळीतील वडज धरणाचा विसर्ग व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात काल अखेर 67 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील आठवड्यापासून कुकडी प्रकल्पातील धरणक्षेत्रात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वडज धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाला असल्यामुळे त्यामधील पाणी त्याचबरोबर भीमाशंकर खोर्‍यात पडत असलेल्या पावसाचे पाणी घोड धरणात येत आहे. त्यामुळे जलाशयात काल अखेर 4357 दलघफू पाणीसाठा जमा झाला आहे. घोड धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा-शिरूर तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com