कुकडी संदर्भात अनुराधा नागवडे जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला

कुकडी संदर्भात अनुराधा नागवडे जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला

25 एप्रिलपर्यंत आवर्तन सोडण्याची केली मागणी

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन 25 एप्रिलपर्यंत सोडावे, त्याचबरोबर डिंभे ते माणिकडोह बोगद्याला निधी द्यावा

तसेच बोगद्याचे काम सुरू होईपर्यंत फिडर कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी बुधवारी (दि. 14) पुणे येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. याबाबत माहिती देताना अनुराधा नागवडे म्हणाल्या, कुकडीचे आवर्तन मे महिन्यांत मिळाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होईल.

चारा व फळबागा जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे देखील दुर्भिक्ष निर्माण झाले असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना 25 एप्रिलपर्यंत पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

नागवडे म्हणाल्या, गेली अनेक वर्षे कुकडी लाभक्षेत्रात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकर्‍यांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. प्रलंबित असलेल्या डिंभे ते माणिकडोह बोगद्याचे काम झाल्यास कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

त्याचबरोबर ‘फिडर’ कालव्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निधी उपलब्ध होऊन देखील दुरुस्तीचे काम झालेले नाही, ‘फिडर’ कालव्याची दुरुस्ती झाल्यास पाण्याचा मोठा अपव्यय रोखणे शक्य होईल. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीची देखील मागणी केल्याचे नागवडे यांनी सांगितले. कुकडीचे एप्रिल महिन्यात आवर्तन, डिंभे ते माणिकडोह बोगदा, फिडर कालव्याची दुरुस्ती आणि पायथा ते माथा आवर्तनाच्या पध्दतीमधील त्रुटी या सर्वच बाबींवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्याचे जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com