कुकडी कारखाना निवडणूक बिनविरोध

माजी आमदार जगताप यांनी केले पुन्हा वर्चस्व सिद्ध
कुकडी कारखाना निवडणूक बिनविरोध

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

स्व. कुंडलीकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांनी विरोधकांना शांत करत सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

माजी आमदार जगताप यांचे वडील कै.कुंडलीकराव जगताप हे संस्थापक अध्यक्ष राहिलेले कुकडी सहकारी साखर कारखान्यात कायम जगताप कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक वगळता विरोधकांना अनेकवेळा पूर्ण पॅनल देखील उभा करता आलेला नाही. यावेळी देखील पाचपुते समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर यांच्यावर जगताप यांच्या विरोधाची धार टिकून होती. मात्र, त्यांना पुरेसे पाठबळ मिळेल अशी अवस्था नसल्याने अगोदरपासून कारखाना निवडणुकीत फारशी रंगत दिसत नव्हती.

जगताप यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पानसरे आणि साजन पाचपुते हे पॅनलचे नेतृत्व करणार असे वाटत असले तरी शेवटच्या क्षणी परिस्थिती पाहून विरोधकांनी तलवारी म्यान केल्याने कुकडी सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा करत जगताप यांनी एकहाती वर्चस्व सिद्ध करत निवडणूक बिनविरोध केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप या देखील संचालक असणार आहेत.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये निवृत्ती मल्हारी वाखारे, विजय परसराम शिर्के, सुभाष शहाजी राक्षे, विवेक सोपान पवार, संभाजी आबा देवीकर, अशोक भिवाजी वाखारे, मनोहर गंगाधर शिंदे, कचरुजी त्रिंबक मोरे, राहुल कुंडलिकराव जगताप, प्रमोद सोमनाथ इथापे, गुलाबराव आढाव मोहन, मच्छिंद्र भगवान नलगे, जालिंदर बापूराव निंभोरे, अशोक धोंडीभाऊ शितोळे, बाळासाहेब बापूराव उगले, प्रणोती राहुल जगताप, आबासाहेब बापू शिंदे, अनिता सुभाष लगड, विमल अशोक मांडगे, मोहन बाजीराव कुदांडे, संपत महादू कोळपे या संचालकांची निवड बिनविरोध झाली.

माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करत असताना जगताप यांनी त्यांच्या बाजूच्या काही इच्छुकांची देखील समजूत काढत विरोधकांना देखील निवडणूक झाली तर काय चित्र राहील हे चित्र समाजावून सांगत वर्चस्व सिद्ध केले. यावेळी त्यांना राष्ट्रवादी नेते घनश्याम शेलार यांची ही साथ मिळाल्याने ते अधिक जोमात असताना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांना कुकडी कारखाना निवडणुकीत यावेळीही आपले सामर्थ्य दाखवता आले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com