
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
पुणे जिल्ह्यात कुकडीचा कॅनॉल फोडून श्रीगोंदा तालुक्यातील व पूर्व भागातील शेतकर्यांच्या पिकांना कुकडी आवर्तन मिळू नये असा कुटील डाव विरोधी पक्षाच्या लोकांनी आखला आहे, असे पाप करून नका असा इशारा आ. बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. पाचपुते यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा व पूर्व भागात पाणी सोडवे अशी गेली अनेक दिवस शेतकर्यांची मागणी होती. त्यानुसार केलेल्या पाठपुराव्यामुळे 2 जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील व पूर्व भागातील शेतकर्यांसाठी एक टी.एम.सी.पाणी कोटा मंजूर करण्यात येऊन आवर्तन सोडण्यात आले. मात्र शेतकर्यांना मिळणारा आवर्तनाचा लाभ मिळू नये, तालुक्यातील शेतकरी वर्गात आमदार पाचपुते यांच्याविषयी राग निर्माण व्हावा असा कुटील डाव पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या काही लोकांनी आखला व 20 कि.मी.वर पुणे जिल्ह्यात कुकडीचा मुख्य कॅनॉल फोडण्याचे पाप या आसुरी वृत्तीने केले आहे.
याबाबत जलसंपदा विभागातील अधिकार्यांकडून माहिती घेतली असून हे दुष्ट कृत्य करणार्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास त्यांच्या पदरात पडावा यासाठी शासनाचे मंत्री, आमदार मेहनत करतात. तर राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकर्यांच्या ताटातील घास हिरावून घेण्याचे पाप विरोधक करत आहेत. ही अतिशय निंदा जनक बाब असून तालुक्यातील शेतकरी व भारतीय जनता पार्टीच्यावतीने या कुकृत्याचा मी निषेध करत आहे.