कुकडी अवर्तनापासून कुळधरणचे शेतकरी वंचित

सिंचन विभागात नियोजनाचा अभाव
कुकडी अवर्तनापासून कुळधरणचे शेतकरी वंचित

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कुळधरण येथून जाणार्‍या 15 क्रमांक चारीवरील शेतकरी कुकडी आवर्तनापासून वंचित राहिले आहेत. सिंचन विभागातील नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुकडीचे आवर्तन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी आ. रोहित पवार व आ. राम शिंदे हे प्रयत्नशील होते. मात्र नेहमीप्रमाणेच कुळधरण येथील सिंचन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष करून शेतकर्‍यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. उन्हाळी आवर्तन हे शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे असते. कुळधरण भागात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतलेले आहे. कुकडीच्या हक्काचे आवर्तन मिळेल, या आशेने शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन केले. मात्र 15 क्रमांकाच्या चारीवरून भिजणार्‍या क्षेत्रात पाणीच पोहोचले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कुकडी विभागाचे अभियंता बोरुडे यांना या संदर्भात भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने विचारणा केली. मात्र माझा आ. राम शिंदे यांच्याशी फोन झाला असल्याचे सांगत वेळ मारून नेली. सिंचन विभागातील अनेक अधिकारी कुळधरण येथील कार्यालयाकडे फिरकत नाहीत. मस्टरवर सह्या करण्यापुरतेच ते कार्यालयाकडे असतात. कुकडी आवर्तन सुरू असतानाही ते गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकरी आवर्तनापासून वंचित राहत आहेत.

कुळधरण भागात अनेक ठिकाणी मोकळ्या माळरानांवर मोकाट पाणी सोडले जाते. मात्र दुसरीकडे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक राहिला नसल्याने कुकडी आवर्तनाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र कुळधरण भागात दिसत आहे. त्याचा फटका सामान्य शेतकर्‍यांना बसला असून संतप्त शेतकर्‍यांनी अंदोलनाचा इशारा दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com