
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
पाणी नियोजनाबाबत पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन योग्य वेळेत व उच्च दाबाने सोडण्याबाबत तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणार्या शेतीला नदीतून पाणी मिळावे याबाबत चर्चा करत मंत्र्यांचे लक्ष वेधले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत तालुक्यातून कुकडी डावा कालवा जातो. त्याचा तालुक्यातील एकूण 54 गावांना शेतीसाठी उपयोग होतो. पावसाळा संपून तब्बल दोन महिने झाले असून कुकडी लाभ क्षेत्रातील गावातील पाणी पातळी काही प्रमाणात खाली गेलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांच्या उभ्या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकर्यांची अतोनात नुकसान होऊ शकते. सध्या या पिकांना पाण्याची गरज आहे. तसेच मतदारसंघातील शेतकर्यांकडून कुकडी आवर्तनाबाबत वेळोवेळी मागणी होत आहे. ही सल्लागार समितीच्या लक्षात आणून देत कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन उच्च दाबाने व योग्य वेळेत सोडण्याबाबतची मागणी त्यांनी यावेळी केली.
कर्जत तालुक्यात असलेली मौजे बाभूळगाव दुमला, शिंपोरा, आवटेवाडी, खेड (शिवशंभोवाडी), गणेशवाडी, भांबोरा, सिद्धटेक, बेर्डी व दुधोडी ही गावे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या सुरुवातीची गावे असल्याने या गावांच्या शेतीला मार्चपासूनच पाणी अपुरे पडण्यास सुरुवात होते. हीच गोष्ट आमदार रोहित पवार यांनी बैठकीत उपस्थित मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देत उन्हाळ्याच्या सुरुवातीस या गावांना शेतीसाठी पाणी मिळण्याच्या दृष्टीने नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी विनंती केली आहे.
योग्य नियोजन झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस गावांना शेतीसाठी पाणी मिळाले तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकर्यांना त्याचा थेट फायदा होईल. यावेळी आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. त्यावर मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार अशोक पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
आ. शिंदेंनीही दिले पत्र
या बैठकीस आ. प्रा. शिंदे उपस्थित नसले तरी त्यांनी मंत्री पाटील यांना पत्र पाठवून कुकडीद्वारे दोन ऐवजी तीन अवर्तने सोडण्याची मागणी केली. यात 25 डिसेंबरला पहिले, 25 फेब्रुवारीला दुसरे व 20 एप्रिलला तिसरे आवर्तन सोडावे अशी मागणी केली आहे. सर्व लाभधारक शेतकर्यांना पाणी मिळेल याचे नियोजन करून अंमलबजावणी करावी, पाणी पुर्ण दाबाने मिळवण्यासाठी स्कॉडची नियुक्ती करावी, टेल टू हेड नियमानुसार पाणी देण्याची अंमलबजावणी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.