कृष्णागर जेजुरकर यांचे दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण

कृष्णागर जेजुरकर यांचे दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील कृष्णागर मनोहर जेजुरकर यांनी हनुमंतगाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासन यांच्या माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या वृक्ष लागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकट्याने दोन हजार वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवले आणि ते दोन महिन्यात पूर्ण करून गावात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

कृष्णागर हे मुंबईला व्यवसायनिमित्त राहतात; परंतु गावाशी असलेली त्यांची नाळ अजूनही तुटलेली नाही. गावातील शेती उत्तम प्रकारे करतात. तसेच त्यांचा मित्रपरिवारही मोठा असून गावात नवनवीन प्रयोग ते करत असतात. मध्यंतरी वाळू तस्करीबाबत त्यांनी जल आंदोलन केले व सामान्य लोकांपर्यंत वाळू तस्करीचे दुष्परिणाम पोहचविण्यात यशस्वी झाले. त्याचवेळेला ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी श्री. कडलग यांनी माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगितले व गावात वृक्षारोपणाचे आवाहन केले.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. जेजुरकर यांनी 2 हजार वृक्ष लावण्याचा संकल्प सोडला आणि आज तो पूर्णत्वास नेला आहे. त्यांचे सहकारी मित्र कैलास ब्राह्मणे यांनी या सर्व वृक्षाच्या देखभालीची जबाबदारी घेतली असून सर्व वृक्ष वाढीस लागणेबाबत दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णागर जेजुरकर यांचा हा स्तुत्य उपक्रम असून याची नोंद सरकार कोठेतरी घेईल, अशी प्रतिक्रिया कैलास ब्राह्मणे यांनी व्यक्त केली. ग्रामविकास अधिकारी श्री. कडलक यांनी कृष्णागर जेजुरकर यांच्या कार्याचे कौतुक करून सर्व नागरिकांनी यापासून प्रेरणा घ्यावी व वृक्ष लागवडीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com