शेतकऱ्यांसाठी 'कृषी संजीवनी मोहीम'

शेतकऱ्यांसाठी 'कृषी संजीवनी मोहीम'

अहमदनगर (प्रतिनिधी)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात २५ जून ते १ जुलैदरम्यान ‘कृषी संजीवनी मोहीम' राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत खरीप हंगामाच्या यशस्वितेसाठी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र बांधावर जात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

या मोहिमेत वेबिनार, शेतीशाळा, घोंगडी बैठका, प्रात्यक्षिके, शिवार फेरी, विविध विषयांवरील प्रशिक्षण या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर (ता. राहाता) व दहिगाव ने. (ता. शेवगाव) येथील शास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार असून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान बांधावर उपलब्ध होणार आहे. यासाठी कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी हे ठिकठिकाणी उपस्थित राहाणार आहेत.

कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता १ जुलै च्या कृषी दिनी जिल्हास्तरावर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमामध्ये जिल्हातील खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेतील जास्त उत्पादन घेणारे शेतकरी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकऱ्यांचा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. कृषी संजीवनी सप्ताहामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

अशी असेल मोहीम

२६ जून हा पौष्टिक तृणधान्य दिवस असून यादिवशी तृणधान्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकांची प्रक्रिया व मूल्यवर्धन व प्रक्रिया केंद्राना प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले जाणार आहे. २७ जून हा महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस असून या दिवशी चर्चासत्र, परिसंवाद व्याख्यानमालात महिलांचा सहभाग वाढविला जाणार आहे. २८ जून हा खत बचत दिवस असून यादिवशी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. २९ जून प्रगतिशिल शेतकरी संवाद दिवस असून या दिवशी यशोगाथा सादर करणे, कार्यशाळा घेणे व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले आहे. ३० जून हा शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस असून या दिवशी शेती व्यवसायपूरक जोडधंदा म्हणून तंत्रज्ञान व योजनांची माहिती दिली जाणार आहे. १ जुलै कृषी दिवस असून या दिवशी कृषी संजीवनी सप्ताह आणि कृषी दिन साजरा करून त्याचे महत्त्व विषद केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com