कोयता गँगने बोल्हेगावात दोन घरे फोडली

साडे अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 5.40 लाखांची रक्कम लंपास
कोयता गँगने बोल्हेगावात दोन घरे फोडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोयत्याचा धाक दाखवून चार जणांच्या टोळीने बुधवारी पहाटे बोल्हेगाव उपनगरातील नवनाथनगरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी घरफोडी करून पाच लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम व साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण आठ लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या कोयता गँगमुळे बोल्हेगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ भाऊसाहेब भोर (वय 35 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दिनांक 21) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भोर कुटुंब रात्रीचे जेवण करून झोपी गेले होते.

बुधवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास अचानक काहीतरी वाजल्याचा आवाज आल्याने नवनाथ व त्यांची पत्नी रेणुका यांनी झोपेतून उठून पाहिले असता त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून तोंडाला मास्क व रुमाल बांधून असलेले चार जण घरात आले होते. त्यांच्या हातामध्ये कोयता, दगड व कटावणी होती. नवनाथ यांनी उठण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक जण त्यांना म्हणाला की,‘तू जागेवरून हालण्याचा व आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर तुला एका दगडातच खाली पाडीन’, असे म्हणताच नवनाथ व पत्नी रेणुका घाबरल्यामुळे ते जागेवरच बसून राहिले.

त्यानंतर त्यातील एक जण नवनाथ व पत्नी रेणुकाजवळ थांबून जीवे मारण्याचा दम देत होता व तीन जण घरातील संसारोपयोगी साहित्याची उचकापाचक करत होते. नवनाथ यांच्या घरातील दोन लाख रुपये रोख रक्कम व सात तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यांनी काढून घेतले. ‘तुम्ही जर कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, असा दम देऊन ते चौघे पसार झाले. ते पसार झाल्यानंतर नवनाथ व त्यांच्या भावाने आरडाओरडा केला असता बरेच लोक जमा झाले. त्यानंतर तोफखाना पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

याच टोळीने अंबादास भागुजी वाकळे (वय 40 रा. बोल्हेगाव) यांच्या घरी धुमाकूळ घालत रोख रक्कम, दागिने चोरले. वाकळे कुटुंंब मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता जेवण करून दरवाजा आतून बंद करून झोपी गेले होते. बुधवारी पहाटे दीड वाजता अचानक आवाज आल्याने अंबादास व त्यांच्या पत्नीने झोपेतून उठून पाहिले असता चौघे त्यांना घरात आलेले दिसले. त्यांच्या हातामध्ये कोयता व दगड होते. अंबादास यांनी आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्यांना दगड फेकून मारला.

तो त्यांच्या उजव्या हाताच्या कोपर्‍याला लागल्याने ते घाबरले व त्यांनी जागेवर बसून घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांना सुध्दा चोरट्यांनी शांत बसण्याचे सांगितले. त्यानंतर दोन जण वाकळे कुटुंबाच्या जवळ उभे राहून दोन जण घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील तीन लाख 40 हजारांची रोख रक्कम व साडे चार तोळ्याचे सोन्याचे दानिगे असा ऐवज घेऊन पसार झाले.

पोलीस मागावर

बोल्हेगाव उपनगरात कोयता गँगने धुमाकूळ घालत धाडसी चोरी केल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com