
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मंगळवारी (दि. 24) दसरा सणानिमित्त महात्मा फुले चौकात आयोजित रावण दहन (Ravan Dahan ) बंदोबस्तास हजर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक आश्विनी मोरे यांना एका महिलेने आरेरावी करून धमकावले (Threat) असल्याची घटना घडली. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे, महिला पोलीस अंमलदार आरवडे, अंमलदार डाके, सय्यद, पांढरकर, खामकर आदींना मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले चौक येथे दसर्या निमित्त रावण दहनाचा बंदोबस्त नेमण्यात आला असल्याने सर्व जण बंदोबस्तावर हजर होते. तेथे एक 35 वर्षीय महिला रस्त्याच्या मधोमध उभी होती. उपनिरीक्षक मोरे यांनी तिला रस्त्याच्या बाजुला उभी राहण्यास सांगितले असता त्या महिलेने उपनिरीक्षक मोरे यांना आरेरावी केली. उपनिरीक्षक मोरे यांच्यासह तेथे बंदोबस्तावर असलेल्या अंमलदारांना वाईट शब्द वापरून मोरे यांच्या हाताला जोराचा झटका मारून धमकावले. मोरे व त्यांचे पथक करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, काही वेळाने ती महिला घटनास्थळावरून निघून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता मिळून आली नाही. उपनिरीक्षक मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.