कोतूळला शनी व वरदविनायक मंदिरातील दानपेटीची चोरी

कोतूळला शनी व वरदविनायक मंदिरातील दानपेटीची चोरी

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील श्री वरदविनायक मंदिराची दानपेटी फोडण्याचा तर शनी मंदिरातील दान पेटीच चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोतूळ येथील श्री वरदविनायक गणपती मंदिर हे प्राचीन व जागृत देवस्थान आहे परिसरात नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. शनिवारी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिरा गाभार्‍याचा कडी-कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला.

मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर गणपती मंदिरा शेजारी असलेल्या शनी मंदिराचे कुलूप चोरट्यांनी तोडले व मंदिरात प्रवेश केला, तेथेही दानपेटी फोडता न आल्याने दानपेटीसह चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी सहा वाजता मंदिराचे पुजारी त्रिंबक शेटे नियमित पूजेसाठी मंदिरात गेले असता सदरची चोरी उघडकीस आली. ही बातमी गावात वार्‍याच्या वेगाने पसरल्याने गणेश भक्तांनी मंदिर परिसरात सकाळी मोठी गर्दी केली होती.

एक व्यक्ती दानपेटी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रदीप भाटे, विनय समुद्र, दीपक परशुरामी यांनी तक्रार दिली आहे. अकोले पोलीस ठाण्याचे पीएसआय भूषण हांडोरे यांनी देवस्थानला भेट देऊन परिसराची तपासणी केली व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने व आदल्याच दिवशी दानपेटीतील रक्कम काढल्याने रोख रकमेची चोरी झाली नाही मात्र दहा हजार पाचशे रुपये किमतीची दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी दिली.

यापूर्वी देखील कोतुळ मधील स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर व कोतुळेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला मात्र अद्यापही चोरट्यांचा तपास लागलेला नाही. याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोतूळ मध्ये झालेल्या सर्व चोर्‍यांचा तपास तातडीने करावा व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, भाजप नेते सोमदास देशमुख, प्रल्हाद देशमुख आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com