नवीन नाशिक
नवीन नाशिक
सार्वमत

कोतूळच्या तिघांच्या तडीपार आदेशाला नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल

Arvind Arkhade

कोतूळ|वार्ताहर|Kotul

हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दीड वर्षांसाठी अकोले तालुक्यातील कोतूळ येथील तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या तडीपार आदेशाला नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अपील करत अ‍ॅड. संदीप बी.जगनर यांच्यामार्फत आव्हान दिले आहे.

कोतूळ येथील मोहन सखाराम खरात (वय 26), गुलाब भिकाजी खरात (38), अमोल भिकाजी खरात (वय 33) (तिघे रा. कोतूळ) यांना नगर, नाशिक, पुणे, ठाणे अशा चार जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. या निर्णयाने अकोले तालुक्यातील गुन्हेगारी जगताला पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. मात्र हा धक्का राजकीय हेतूने प्रेरीत आहे असा आरोप करण्यात आला आहे.

कोतूळ परिसरात संघटीत गुन्हेगारी निर्माण करून दहशत माजविणे, लोकांना मारहाण करणे, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, मारामारी करून दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, दगडफेक करून दुखापत करणे, अशा गंभीर गुन्ह्यांचा ठपका पोलिसांनी या तिघांवर ठेवला आहे.

अवैध धंद्यांतून तालुक्यात गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंद्यांना तसेच गुन्हेगारीला जरब बसावा यासाठी राजूरच्या शुक्ला टोळीनंतर कोतूळच्या खरात टोळीवर तडीपारीची कारवाई करून चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील टोळी प्रमुख मोहन सखाराम खरात व सदस्य गुलाब भिकाजी खरात यांना दीड वर्षासाठी तर अमोल भिकाजी खरात यास एक वर्षासाठी नगर जिल्ह्यासह नाशिक, सिन्नर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर अशा जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.

अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी खरात टोळीवर तडीपारीची कारवाई केली आहे.

अपिलार्थी निर्दोष असतानाही त्यांना दोषी धरून, पोलीस निरीक्षक अकोले, उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्याकडील कागदपत्रांची, चौकशी अहवालाची सत्यता न पडताळता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.

-अ‍ॅड. संदीप बी.जगनर

या कारवाईतील गुलाब भिकाजी खरात हे कोतूळच्या उपसरपंच सविता खरात यांचे पती आहेत तर अमोल भिकाजी खरात हे दीर आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही ऐन करोना साथरोग लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तडीपारीचा दिलेला आदेश चुकीचा आहे. जिल्हाबंदी,संचारबंदी असताना तडीपारीची कारवाई ही राजकीय सूड भावनेतून केली असल्याचा आरोप कोतूळ सोसायटीचे माजी संचालक लहानु खरात यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com