कोठला येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण

उद्या रमजान ईद; पोलिसांचा बंदोबस्त
कोठला येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

आज (मंगळवार) रमजान ईद साजरी होत आहे. करोना नियम शिथिल झाल्यानंतर यंदा प्रथमच रमजान ईदला सामुदायिक नमाज पठण होत आहे. त्यात राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अहमदनगर शहर पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त सतर्कत असल्याचे दिसून येत आहे. शहरात सुमारे चारशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय सुमारे दोनशे होमगार्ड बंदोबस्तावर आहेत.

नगर शहरात रमजान ईदनिमित्त नेहमीप्रमाणे कोठला येथील ईदगाह मैदान आणि शेजारून जाणार्‍या नगर-औरंगाबाद महामार्गावर सामुदायिक नमाज पठण होणार आहे. यासाठी पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा आदेशही जारी केला आहे. रमजान ईदला सकाळी सामुदायिक नमाज पठण होते. यासाठी मुस्लिम बांधव कोठला येथील ईदगाह मैदानावर एकत्र येतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर धर्मीय नागरिकही उपस्थित असतात. मैदानावरील जागा अपुरी पडत असल्याने शेजारून जाणार्‍या महामार्गाचाही वापर केला जातो. त्यासाठी या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती अन्य मार्गाने वळविण्यात येते.

यावर्षीही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा आदेश काढला आहे. ईदच्या दिवशी सकाळी कोठला येथील ईदगाह मैदान आणि हायवे रोड या ठिकाणी मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणास अडथळा निर्माण होऊ नये, वाहनांचा कर्कश आवाजाचा व्यत्यय येवू नये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे

यावेळी ईदगाह मैदानावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच ठरलेल्या ठिकाणी नमाज पठण होणार आहे.

वाहतूकीत बदल

औरंगाबाद आणि मनमाडकडून येणारी वाहतूक पोलीस अधीक्षक चौकातून भिगांरमार्गे चांदणी चौकाकडे वळविण्यात आली आहे. तर पुणे, सोलापूरकडून येणारे वाहने चांदणी चौक, बेलेश्वर चौक, किल्ला चौक या मार्गे एसपी ऑफिस चौकाकडे वळविण्यात आली आहे. सर्व अवजड वाहने बायपास रोडने वळविण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी सात ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

असा आहे बंदोबस्त

अपर अधीक्षक 1, पोलीस उपअधीक्षक 2, पोनि/सपोनि/उपनिरीक्षक 18, पोलीस अंमलदार 250, राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, होमगार्ड 170 असा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय ड्रोन कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील स्वत: लक्ष ठेऊन आहेत.

Related Stories

No stories found.