शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

देशातील सर्वाधिक भाविकांची गर्दी होत असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारने कान्हुराज बगाटे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी

पदावर नेमणूक केल्यामुळे साईसंस्थानचा कारभार गतिमान झाला आहे. भाविकांच्या सुकर दर्शनासाठी बगाटे यांनी केलेली उपाययोजना प्रशंसनीय असल्याची भावना शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त कैलासबापू कोते यांनी व्यक्त केले.

शिर्डी येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना कैलास कोते यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने साईबाबा संस्थानचा कारभार बघण्यासाठी विश्वस्त मंडळ नेमले नसल्याने शिर्डी शहराच्या विकासाला मोठा ब्रेक बसला आहे. कान्हुराज बगाटे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकार्याची साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यांनी साईबाबा संस्थानच्या प्रशासनात शिस्त लावण्याचे काम केले.

लॉकडाउनच्या काळात मंदिर भाविकांसाठी सुरू व्हावे यासाठी सरकार पातळीवर विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर देशाच्या विविध भागातून शिर्डीत येणार्या भाविकांना सुरक्षित दर्शनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. त्यामुळे मंदिर सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतरही एकही भाविकांना करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. साई मंदिरातील दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

शिर्डीत भाविक नसल्याने शिर्डीच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. याचे भान शिर्डीतील पदाधिकारी व नागरिकांनी ठेवण्याची गरज आहे. बगाटे यांनी शिर्डीच्या अर्थकरणाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना आपल्या आहेत. अनेक वर्षानंतर प्रथमच कार्यक्षम अधिकारी साई संस्थानला लागला असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी बगाटे यांना सहकार्य करण्याची गरज आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून प्रलंबित असलेले लेझर शो, गार्डन सारख्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी बगाटे यांनी लक्ष घालावे. या कामासाठी त्यांना सहकार्य करण्याची आपली तयारी आहे.

संस्थान रुग्णालयात रिक्त जागांवर चांगल्या डॉक्टरांच्या नेमणुका करण्याची गरज असून रुग्णालयातील एकल पदावर काम करणार्या कर्मचारी, अधिकार्यांना सरकारच्या नियमाप्रमाने नव्याने वेतनश्रेणी देण्यासाठी बगाटे यांनी पुढाकार घ्यावा. तसेच संस्थान कर्मचार्यांसाठी मागील विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी व पेन्शन योजनेची तसेच अन्य निर्णयांची तातडीने अमंलबजावणी करावी, असे आवाहनही कोते यांनी केले.

लॉकडाउनमुळे शिर्डीत अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. संस्थान प्रशासनाने गर्दीचे नियोजन चांगले केल्याने आता शिर्डीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे आशेचा किरण व्यावसायिकांना दिसू लागला आहे. साईसंस्थान प्रशासनाला ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास शिर्डीचे अर्थकारण पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. भाविकांना व्यावसायिकांनी चांगली सेवा देऊन भक्तिभाव निर्माण केला पाहिजे.