पारनेर |प्रतिनिधी| Parner

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थानचा

20 डिसेंबरला होणारा चंपाषष्ठी महोत्सव रद्द केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिली.

याबाबत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा, (ता. पारनेर) या राज्यस्तरीय तिर्थक्षेत्रावर करोनाच्या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबरला येणारा 24 व्या वर्षाचा द्वितपपूर्ती चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे 11 ते 18 डिसेंबरला सोमवती अमावस्या या उत्सवाचेही आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीला अध्यक्ष अॅड. गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सहसचिव मनीषा जगदाळे, विश्वस्त किसन धुमाळ, मोहन घनदाट, अमर गुंजाळ, चंद्रभान ठुबे, किसन मुंढे, बन्सी ढोमे, देवीदास क्षीरसागर, दिलीप घोडके उपस्थित होते. त्यानुसार चंपाषष्ठी महोत्सवातील दिंडी व पालखी सोहळा, कीर्तन, महाप्रसाद वाटप, सत्संग सोहळा, खंडोबा गाणी स्पर्धा इत्यादी कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाविक, भक्त, यात्रेकरू यांनी देवस्थानजवळ गर्दी टाळावी, दर्शनासाठी मास्क लावणे, हात सॅनीटाईज करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गाभार्यात गर्दी टाळणे, दहा वर्षांखालील मुले-मुली व 65 वर्षावरील वयोवृद्ध आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश बंद आहे. या नियमांचे पालन करून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.