कोरठण खंडोबा मंदिर परिसरातील चांदीच्या पादुकांची चोरी !
सार्वमत

कोरठण खंडोबा मंदिर परिसरातील चांदीच्या पादुकांची चोरी !

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान प्रति जेजुरी म्हणून समजले जाणारे व राज्य शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान परिसरामध्ये चोरीची घटना घडली. खंडोबा मंदिरासमोर असणार्‍या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबतची माहिती अशी, की कोरठण खंडोबा देवस्थान गडावर सोमवती अमावास्येनिमित्त दि. 20 रोजी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात धार्मिक कार्यक्रम पार पडला. परिसरातच मुख्य मंदिरासमोर खंडोबा देवाची पितळी मूर्ती आहे. तेथे बाहेरील बाजूस भाविकांना दर्शन घेण्यासाठी चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. पहाटे या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुके पडते. याचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे तीनच्या सुमारास या पादुका लोखंडी हत्याराच्या साहाय्याने काढून पोबारा केला.

याच ठिकाणी खालच्या बाजूस असणार्‍या भक्तनिवासाच्या दरवाजांच्या कडी कोंडा देखील तोडण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणी चोरण्यासाठी काही हाती लागले नाही. हा सर्व प्रकार मंदिरामधील सी. सी. टीव्हीमध्ये कैद झाला असून या व्हीडिओमध्ये दोन चोर तोंडाला कापड (बुरखा) बांधून पादुका चोरताना दिसत आहेत.

ही घटना समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदिर परीसराची पहाणी केली. मंगळवारी (दि. 21) देवस्थानमार्फत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिली.

दरम्यान मंदिर परिसरामध्ये झालेल्या चोरीबाबत मंदिर प्रशासनाने मोजक्या विश्वस्तांना याबाबत माहिती कळविली ; मात्र काही विश्वस्तांना याबाबत अंधारात ठेवण्यात आले, याबाबत विश्वस्त चंद्रभान ठुबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com