कोर्‍हाळेत पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन

पाण्यासाठी घराबाहेर पडण्याची वेळ
कोर्‍हाळेत पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन

कोर्‍हाळे |वार्ताहर| Korhale

सगळीकडे करोना सारखे संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना शासनाने नागरिकांना आपण घरातच सुरक्षित राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आव्हान केले असताना राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील नागरिकांना मात्र लॉकडाऊनच्या काळातही पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

कोर्‍हाळे येथील नागरिकांसाठी असणारे सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तळे रिकामे असून त्यामध्ये गोदावरी उजव्या कॅनॉलचे पाणी सोडले जाते. त्यातून कोर्‍हाळे व वाळकी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु यावेळी कॅनॉलला आठ दिवसांपूर्वी पाणी येऊनही तळे रिकामेच आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित पाटबंधारे विभागाकडे तळे भरण्याची मागणी करूनही संबंधित विभागातील अधिकारी वेळकाढूपणा करीत असल्याने परिणामी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना करोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले असतानाही येथील नागरिकांना आपल्या कुटुंबासाठी लागणार्‍या पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

शासन एकीकडे घरातच राहून आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास सांगत आहे. तसेच कोर्‍हाळे नागरिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार, अशी झाली आहे. संबंधित पाटबंधारे विभागाने कोर्‍हाळे सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तलावात लवकरात लवकर पाणी सोडण्याची परवानगी द्यावी जेणेकरून गावातल नागरिकांचा पाणीप्रश्न ग्रामपंचायत प्रशासन मार्गी लागेल. अन्यथा नागरिकांना लॉकडाउन असतानाही रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

कोर्‍हाळे गावातील पाणी पुरवठा तळ्यात पाणी शिल्लक नाही. पाटबंधारे विभागाचे श्री. पोळ यांना फोन केला असता कॅनॉलला पाणी येऊनही आठ दिवसांनी पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. तरी तोपर्यंत करोना लॉकडाऊन काळात गावातील नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्यास त्यास संबंधित पाटबंधारे विभाग जबाबदार राहील.

- वैशाली बाळासाहेब थोरात, प्रथम लोकनियुक्त सरपंच

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com