
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी
जमिनीच्या खरेदीसाठी बँकेतून काढून आणलेल्या साडेसात लाखांच्या रोख रकमेवर अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून गाडीची डीक्की तोडून सुमारे साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोपरगाव शहरातील शुक्लेश्वर मंदिर बेट या ठिकाणी राहणारे विकास मोहन आव्हाड (वय 28 वर्षे) राहणार यांनी गुरुवारी (४ मे) रोजी जमिनीच्या खरेदीच्या व्यवहारासाठी सुमारे साडेसात लाख रुपयांची रोकड बँकेतून काढून आणली होती.
त्यानंतर त्यांनी शहरातील खर्डे कॉम्प्लेक्स समोर गाडी (स्कुटी एम एस 17 सी क्यू 21 86) लावून चौकशी करण्यासाठी गाडीचे हँडल लॉक न करता खाली असलेल्या ऑफिसमध्ये चौकशी करण्याकरता गेले तेवढ्याच वेळेत अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून ही गाडी चोरून नेऊन टिळक नगर येथील असलेल्या सार्वजनिक शौचालय समोर लावून त्या गाडीतील डिक्की तोडून त्यातील सुमारे साडेसात लाख रुपये रोख रक्कम यात पाचशे व शंभर रुपये नोटांचा समावेश होता.
तर चोरट्याने रक्कम घेऊन गाडी त्याच ठिकाणी लावून पसार झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत विकास आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहे.