
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील बाजार तळालगत असणार्या बंधार्यात एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह गोणीत भरून गोणी शिवलेल्या अवस्थेत पाण्यात आढळून आल्याने पोहेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील पोहेगावमध्ये असलेल्या पाणी साठवण बंधार्यात शिवलेल्या गोणीत एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह असल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. नंतर सदरची गोणी ताब्यात घेऊन राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता नेण्यात आली होती.
या घटनेप्रकरणी शिर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे, कोणीतरी अज्ञात इसमाने मयताच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तूने मारून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला. तसेच पांढर्या रंगाच्या गोणीमध्ये मृतदेह भरून ही गोणी शिवून पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील पोहेगाव येथील डोर्हाळे रस्त्यालगतच्या बंधार्यात पाण्यामध्ये फेकून दिला. ही घटना 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयाताची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाची घटना घडल्याने नागरिकांत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध याप्रकरणी गु.रं.नं. 1/2023 भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करत आहेत.