
घारी | वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक विहीर (आड) यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, देर्डे कोऱ्हाळे गावातील बंधाऱ्याजवळ एक जुना आड आहे. त्याच्या जवळ चप्पल ओढणी व मोबाईल अशा वस्तू एका धुणं धुण्यासाठी सकाळी ११ चे सुमारास गेलेल्या महिलेने पाहिल्या व घाबरून तिने जवळच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ही माहिती सांगितली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदा दळवी, उपसरपंच आशा डुबे, ग्रामसेवक योगेश देशमुख, बाबासाहेब डुबे व सर्व सदस्य यांची मासिक सभा चालू असल्यामुळे ताबडतोब त्यांनी सभेचे कामकाज थांबून घटनास्थळी धाव घेतली व पोलीस पाटील विद्या डुबे यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला.
घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी फौज फाट्यासह दाखल होऊन त्यांनी शोधाशोध केली असता एका मुलीचे प्रेत काढण्यात त्यांना यश आले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात आहे याविषयी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.