नगरसेवक बागुल व जाधव कायमस्वरूपी अपात्र, काय आहे प्रकरण?

कोपरगावात राजकीय खळबळ
नगरसेवक बागुल व जाधव कायमस्वरूपी अपात्र, काय आहे प्रकरण?

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे तत्कालीन उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यात माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व माजी नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांना कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्याचा निकाल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला असल्याची माहिती यांनी दिला असल्याची माहिती अॅड. विद्यासागर शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी अॅड. विद्यासागर शिंदे म्हणाले, कोपरगावचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांनी दिलेल्या आदेशानुसार व शासनाचा नियमानुसार कोपरगाव शहरातील अतिक्रमणे नियमाप्रमाणे काढली होती. त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांसह पालिका कार्यालयात जाऊन उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती व नगरपरिषदेचे कार्यालयातील बांधकाम विभागाचे अभियंता दिगंबर वाघ यांना शिवीगाळ करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ नुसार कायदेशीर गुन्हा अर्जदार सुनील जनार्धन फंड व हेमंत यशवंत ढगे यांनी केलेल्या अर्जावरून दाखल करण्यात आला होता.

यावर दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून, सीसी टीव्ही फुटेज, फिर्यादीचे जबाब व मुख्याधिकारी यांचा गुप्त अहवाल यासर्वांची पडताळणी करून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांनुसार दोषी धरत कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आल्याचा अंतिम निकाल दिला आहे. या निकालाने कोपरगावात खळबळ उडाली आहे. कोपरगाव पालिकेच्या कार्यालयात तोडफोड करून बांधकाम अभियंता व उपमुख्याधिकारी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. याचा उद्देश एवढा होता की पालिकेतील अधिकाऱ्यांवर दहशत व दमबाजी होऊ नये आजी माजी नगरसेवकांनी भविष्यात असे कृत्य करू नये व या दोन्ही नगरसेवकांना चपराक बसावी. सुनील फंड, याचिकाकर्ते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com