आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये; विवेक कोल्हेंचा आ. काळेंना टोला

आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये; विवेक कोल्हेंचा आ. काळेंना टोला

कोपरगाव | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन यासारख्या योजनांमधून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी घरकुल व पाणीपुरवठा योजनांची कामे झाली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून अनेक गरजू लोकांना हक्काचे नवीन घर मिळाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न सुटला आहे...

ही सर्व कामे केंद्र सरकारच्या निधीतून झाली असताना देखील स्थानिक आमदार मात्र आपल्या प्रयत्नामुळे ही कामे झाल्याचे जनतेला खोटे सांगून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा टोला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना नाव न घेता लगावला आहे. भाजपच्या वतीने लोकसभा प्रवास योजना या उपक्रमांतर्गत केंद्रीय जलशक्ती आणि अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात शनिवारी (१० सप्टेंबर) आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत, जलजीवन मिशन यासारख्या अनेक लोककल्याणासाठी योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘हर घर जल’ ही घोषणा देत सन २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ७१ ग्रामपंचायतींना २७७ कोटींचा निधी या खात्याचे राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.

केंद्र सरकारच्या या निधीतूनच या ७१ गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान आवास योजने’ च्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील अनेक गरजू लोकांना घरे मिळाली. ही वस्तुस्थिती आहे; परंतु कोपरगावचे स्थानिक आमदार मात्र याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेची दिशाभूल करीत आहेत. न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याची त्यांना जणू सवयच लागली आहे, उपरोधिक टोला मारत आमदाराचा हा खोटेपणा आणि मतलबी राजकारण जनतेने लक्षात घेतला पाहिजे, असे विवेक कोल्हे म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आमदाराचा हा खोटेपणा उघड केला याबद्दल कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com