दोन्ही युवा नेत्यांनी 'श्रद्धा आणि सबुरी' महामंत्र आचरणात आणून कोपरगावची संस्कृती जपावी

बिपीन कोल्हेंचा वडिलकीचा सल्ला
दोन्ही युवा नेत्यांनी 'श्रद्धा आणि सबुरी' महामंत्र आचरणात आणून कोपरगावची संस्कृती जपावी

कोपरगाव | प्रतिनिधी

कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत तर विवेक कोल्हे हे जिल्हा बँकेचे संचालक व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आहे.

साईबाबांनी संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’ चा संदेश दिला त्याच संदेशाचे आचरण आज जगभरातील करोडो साईभक्त करत आहेत. या युवा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोपरगावची संस्कृती जपून जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असा वडिलकीचा सल्ला श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन शंकरराव कोल्हे यांनी दिला आहे.

कोपरगाव तालुक्यातील काळे आणि कोल्हे घराण्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. माजी खासदार स्व. शंकरराव काळे आणि माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी होते. या दोन्ही नेत्यांनी आपल्या हयातीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून राजकीय संघर्ष केला; परंतु तालुक्याच्या विकासामध्ये कधीही टोकाचे राजकारण केले नाही. राजकारणात हे दोन्ही नेते अनेकदा परस्परांविरुद्ध लढले. मात्र, जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी आपल्या आयुष्यात सदैव समंजसपणाचे आणि शालिनतेचे राजकारण केले. त्यांनी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.

सामान्य जनता कोविड महामारीतून आता कुठेतरी बाहेर पडत आहे तसेच बाजारपेठही सावरत आहे. व्यापारी वर्ग ही या आर्थिक संकटातून सावरत आहे. इथून पुढे आपले सर्व धर्मीय सण व उत्सव सुरु होत आहेत . त्याचा परिणाम शहराच्या व तालुकाच्या बाजारापेठेवर सकारात्मक दिसत आहे अशा वेळी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका व जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज असून शहराची सामाजिक शांतता व आर्थिक स्थैर्य बिघडेल असे कृत्य कुणीही करू नये अशी सूचना वजा समज बिपिन कोल्हे यांनी दिला.

सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्याला समोरचा माणूस कितीही बेताल वक्तव्य करत असला तरी सबुरीने वागण्याची शिकवण दिली असून तीच आचरणात आणूया. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी. आपल्याला सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना वेठीस धरायचे नाही. त्यांना त्रास होईल असे काही करायचे नाही. कार्यकर्त्यांनी आपला संयम ढळू न देता समंजसपणे वागावे, असे आवाहन बिपीन कोल्हे यांनी केले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आमदार काळे यांनी राजकारण बाजूला ठेवून राजकीय विरोधकांसोबत एकत्र बसून चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही बिपीन कोल्हे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com