अंजनापुरात बिबट्याने पाडला दोन बोकड व एक शेळीचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
रांजणगाव देशमुख । वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास शेळ्यांच्या गोठ्यात घुसुन बिबट्याने तिन शेळ्या ठार केल्या असुन एक शेळी जखमी केली आहे.
अंजनापुर येथील दादासाहेब पुंजाहरी गव्हाणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्याच्या दरवाच्यावरुन उडी मारत आत प्रवेश करुन एक बोकड व एक शेळी जागीच ठार झाली तर एक बोकड उचलुन शेजारील गिन्नीगवतात त्या बोकडाचा फडशा पाडला व गोठ्यातील अजुन एक शेळी जखमी केली. बाजुला बांधलेल्या जनावरांनी आवाज केल्याने गव्हाणे यांना जाग आली. ते घराच्या बाहेर येताच बिबट्या तोंडात बोकड घेउन जातांना त्यांनी पाहीला. या गोठ्यात अजुन दहा शेळ्या होत्या मात्र इतर जनावरांच्या आवाजाने बिबट्याने तेथुन पलायन केले. वनविभागाने कर्मचारी एस.एस.गोसावी यांनी घटनेचा पंचनामा केला असुन पशुसंर्वधन विभागाने मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले आहे.
गेल्या अनेक दिवसापासुन दोन बिबटे रांजणगाव देशमुख, अंजनापुर परिसरात सातत्याने आढळत आहेत.त्यामुळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेक वेळेस तर दिवसाही हे बिबटे शेतक-यांना आढळले आहेत. या बिबट्यांचा वन विभागाने पिंजरा लावुन तात्काळ बंदोबस्त अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.