कोपरगावचा पाणीप्रश्न आमदार काळेच सोडविणार

पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजणार्‍या कोल्हे कुटुंबाला राजकीय अस्तित्व संपण्याची भिती - गंगुले
कोपरगावचा पाणीप्रश्न आमदार काळेच सोडविणार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना 5 नंबर साठवण तलावाचे महत्व मात्र समजले आहे. 5 नं. साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी 120 कोटीची तांत्रिक मंजुरी आ. आशुतोष काळे यांनी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणार्‍या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करण्याचे काम सुरु केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्यावर केली आहे.

विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनील गंगुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील पाच वर्षात राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असताना देखील कोल्हेंना शहराचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही. ते काम आ. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात करून दाखविल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 120 कोटीची तांत्रिक मंजुरी ही त्यांची खरी पोटदुखी आहे.

पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. हे शहरातील प्रत्येक नागरिक जाणून आहेत. मात्र आजवर ज्या कोल्हे कुटुंबानी या पाणीप्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजली त्यांना आता आपली पाण्याची दुकानदारी बंद करावी लागणार असल्याचे दु:ख आहे. त्यामुळे त्यांची होणारी आदळआपट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदा घेऊन व विकासकामे करणार्‍या आ. आशुतोष काळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून आपल्याच कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळविण्यात बाळराजांना आनंद वाटत आहे.

मात्र त्यांनी खालच्या भाषेत केलेली टीका हा त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा भाग आहे. परंतु 40 वर्ष सत्ता भोगूनही पाणी प्रश्न सोडवू न शकलेल्या व 42 कोटीच्या पाणी योजनेची कोणी वाट लावली? याबाबत आपल्या परिवारासोबत चर्चा करून 40 वर्ष अक्कल कुठे गहाण ठेवली होती? हे प्रसिद्धी माध्यमांपुढे खालच्या भाषेत बोलणार्‍या बाळराजांनी विचारले पाहिजे, असा सल्ला विवेक कोल्हे यांना गंगुले यांनी दिला आहे.

राजकीय द्वेषापोटी पत्रकार परिषदा घेऊन प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी आत्मीयता असावी लागते. ही आत्मियता आ. आशुतोष काळे यांच्याकडे आहे. दोन ट्रक तांत्रिक मंजुर्‍या कोपरगाव नगरपालिकेत पडून असल्याचे सांगणार्‍यांनी ज्याप्रमाणे 28 विकास कामांच्या मंजुर्‍या अडवल्या त्याप्रमाणे या मंजुर्‍या अडवल्यामुळेच आजपर्यंत कोपरगाव शहराचा विकास होवू शकला नाही, असा टोला श्री. गंगुले यांनी लगला आहे.

5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 120 कोटीची तांत्रिक मंजुरी आ. आशुतोष काळे यांनी मिळविली आहे. पुढे प्रशासकीय मान्यता देखील मिळवणार आहे. बेलगाम असणार्‍यांना लगाम घालून बाळराजांचा हट्ट पूर्ण करून शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार आहे. मात्र ज्या कोल्हे कुटुंबांनी 28 विकास कामांना न्यायालयात नेवून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा केला त्यांची तळी येत्या निवडणुकीत कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदार भरणार असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com