कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका रोमहर्षक होणार

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका रोमहर्षक होणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील 17 ग्रापंचायतींच्या निवडणुका पाच नोव्हेंबर रोजी होत असून सोमवार 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावागावांत भेटीगाठींना जोराची सुरुवात झाली आहे. उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढती तर काही ठिकाणी दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या सर्व निवडणुका रोमहर्षक होणार हे मात्र नक्की.

तालुक्यातील पोहेगाव, वारी, कान्हेगाव, कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहीगाव बोलका, कारवाडी, शहाजापूर, मंजूर या गावांची निवडणूक होत आहे. सोमवार 16 ऑक्टोबर ते शुक्रवार 20 ऑक्टोबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सोमवारी 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 25 ऑक्टोबरला ज्यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा आहे त्यांना मागे घेता येणार आहे.पाच नोव्हेंबरला मतदान होऊन सहा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

आ. आशुतोष काळे गट, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे गट तसेच महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे व उबाठा शिवसेनेचे नितीन औताडे यांच्या गटांमध्ये निवडणुका रंगणार आहेत. अनेक गावांमध्ये स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्या होतील. सरपंच पदाची थेट निवड असल्याने सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या सगळीकडे जास्त आहे. त्यामुळे नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. एखाद्याच्या नाराजीचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सध्या भेटीगाठी व बैठकांना वेग आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com