बारामती, श्रीरामपूरप्रमाणेच कोपरगावचा साठवण तलाव होणार - ना. काळे

बारामती, श्रीरामपूरप्रमाणेच कोपरगावचा साठवण तलाव होणार - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजनाच्या बाबतीत नेहमीच बारामती आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे उदाहरण दिले जाते. त्याच धर्तीवर कोपरगाव शहरातील नागरिकांना देखील नियमित व मुबलक पाणी देण्यासाठी 5 नं. साठवण तलवाच्या कामाला गती देण्यासाठी मी स्वत: पंधरवड्याला त्याचा आढावा घेणार आहे व मुख्याधिकार्‍यांना देखील दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तम पाणी पुरवठा व्यवस्था म्हटले की, ज्याप्रमाणे बारामती, श्रीरामपूरचा उल्लेख होतो त्याप्रमाणेच भविष्यात बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचे देखील नाव घेतले जाईल, असा विश्वास साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे, पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 5 नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल 131.24 कोटी रुपये निधी आणला आहे. लक्ष्मी कन्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने नुकतेच 95 किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचा सर्व्हे सुरु केला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत कोपरगाव शहराचा ज्वलंत झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षातून व प्रामाणिक प्रयत्नातून मिळालेल्या 131.24 कोटी निधीतून प्राथमिक स्वरूपातील कामास प्रारंभ झाला असून एक महिन्याच्या आत हा सर्व्हे पूर्ण होईल.

या योजनेत एकूण 4 पाण्याच्या टाक्या असून याखेरीज एक मुख्य टाकी देखील असून लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. हा तलाव पूर्ण सिमेंट काँक्रिट मध्ये बांधण्यात येणार असून पाणी गळती होवू नये यासाठी खालच्या बाजूस जिओ मेमरेन फिल्म टाकण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा तलाव फक्त बारामती आणि श्रीरामपूर या ठिकाणी असून आता कोपरगावात अशा प्रकारचा तलाव तयार होणार आहे. 5 नं. साठवण तलाव, वितरण व्यवस्थेबरोबरच जुन्या चारही तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

ही योजना यशस्वीपणे सुरु राहील त्यासाठी विद्युत खर्च कमी करून सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी 1.93 कोटींचा सोलर प्लांट देखील उभारण्यात येणार आहे. योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा असला तरी दोन वर्षाच्या आत या साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे देखील याबाबत आढावा घेवून मला माहिती देतील, अशा सूचना त्यांना केल्या असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, संतोष चवंडके, विरेन बोरावके, मंदार पहाडे, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, सुनील बोरा, राजेंद्र फुलफगर, सागर पाटील, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, अभियंता सुनील ताजवे, हर्षवर्धन सुराळकर, अभियंता गणेश म्हस्के, राहुल कवडे, सुनील मगूकीचा उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com