यंदाही उत्तम पाऊस; कोपरगावातील भैरवनाथांचा कौल

पाऊस
पाऊस

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या

बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात हजारो वर्षाची परंपरा जपत काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाकित सांगण्यात आले. चालू वर्षी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकेल. रोगराईचे प्रमाणही आटोक्यात येईल, असा कौल बालभैरवनाथ महाराजांनी दिला आहे.

काल सकाळी सात वाजता श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट व भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टन्स राखत हजारो वर्षांची परंपरा जपली. तीन प्रतिनिधींच्या उपस्थितीत काल कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

सोमवारी संध्याकाळी मंदिराच्या पाठीमागे अठरा नक्षत्ररुपी गाडग्याच्या आकाराचे खड्डे घेतले. त्या खड्ड्यामध्ये वडाची पाने व सप्तधान्य ठेवली जातात. नंतर खड्डे वडाच्या पाणात पाणी टाकून भरली जातात. पुरोहित व प्रतिनिधी भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची पूजा करून 1 ते 18 प्रमाणे नक्षत्राचा कौल भैरवनाथाकडून घेतला जातो.

गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि भैरवनाथांनी दिलेला कौल तंतोतंत खरा ठरला जातो. खड्यात ठेवल्या जाणार्‍या वडाच्या पाण्यात पाणी भरपूर प्रमाणात असले तर पाऊस चांगला होणार, पाणी मध्यम स्वरूपाचे असेल तर पाऊस मध्यम स्वरूपाचा होणार, पाणीच निघाले नाही तर खड्यात पाणी निघाले नाहीतर पाऊस कमी स्वरूपाचा पडेल असे वर्तविले जाते.

चालु वर्षी आद्ररा, पुनर्वसु ,चित्रा,विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्ररुपी खड्ड्यातून वडाच्या पानात चांगल्या प्रकारे पाणी निघाल्याने या नक्षत्रात पाऊस भरपूर होणार असल्याचा कौल वर्तविण्यात आला. कल्याणी कृतिका, रोहिणी, मृग, पुष्पा, आश्लेषा, पूर्वा, उत्तरा हस्त व स्वाती या नक्षत्र रुपी खड्ड्यातून वडाच्या पाणात मध्यम स्वरूपाचे पाणी निघाल्याने या नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा कौल वर्तवण्यात आला.

अश्विनी (राजा) भरणी (प्रधान) व मघा या नक्षत्रारूपी घड्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात वडाच्या पानात पाणी निघाल्याने या नक्षत्रात कमी पाऊस होणार असल्याचा कौल वर्तवण्यात आला. चालू वर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण राहील. पाऊसमान चांगले असल्याने येत्या काही दिवसात रोगराईचे प्रमाण कमी होईल असेही वर्तविण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com