सावधान, कोपरगाव तालुक्याची हद्द सुरू होत आहे

झगडे फाटा ते तळेगाव दिघे रस्त्यावर खड्डेच खड्डे
सावधान, कोपरगाव तालुक्याची हद्द सुरू होत आहे

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव, संगमनेर, पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा झगडेफाटा ते तळेगाव या रस्त्याची खड्ड्यांमुळे अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. हा रस्ता डांबरी आहे की, खडीचा आहे हेच कळत नाही. या रस्त्याने प्रवास करताना धुळीचे लोटच लोट उठतात. खड्ड्यांची तर स्पर्धाच लागल्यासारखी आहे तू मोठा की मी मोठा. या रस्त्यावरचा प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत.

या रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे संगमनेर हद्दीत मागे एकदा खराब ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती त्यातून काही दिवस निघून गेले आताही खड्डे बुजविण्याचे काम भागवतवाडी पासून सुरू आहे. मात्र कोपरगाव तालुक्याची हद्द सुरू होताच धूळ आणी खड्ड्यांची सुरुवात होते. त्यामुळे सावधान कोपरगाव तालुक्याची हद्द सुरू होत आहे हे समजते.

किती लोकांचे बळी घेतल्यानंतर हा रस्ता संबंधित विभाग दुरुस्त करणार आहे? असा प्रश्न या रस्त्याने नेहमी ये-जा करणार्‍यांना पडत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने तर या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. या रस्त्याला खूप मोठमोठे खड्डे आहेत. वाहने कशी चालवावीत? असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी साईड पट्टे राहिलेले नाही त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

खड्ड्यामधून वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. कायम ये-जा करणार्‍या वाहनधारकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामात लक्ष घालून हा रस्ता दर्जेदार व वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. त्यात या रस्त्याने समृध्दी महामार्गासाठीच्या खडीची अवजड वाहतूक या रस्त्याने होते .आधिच रस्त्याचे वाटोळे झालेले आहे. त्यात या अवजड वाहतुकीची भर त्यात पडत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com