
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव येथील महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने काल शनिवारी पहाटे पाच वाजता अचानक कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जावून तेथील परिचारिकेस फैलावर घेत डॉक्टरांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा वार्ता परिचारिकेच्या प्रतिक्रियेसह सोशल मिडीयावर पसरल्याने ही ‘भेट’ वादाच्या भोवर्यात अडकली आहे.
या महसूल अधिकार्याने पहाटेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सरकारी गाडीसह प्रवेश केला. त्यांनी सरकारी गाडी अंधारात संरक्षण भिंतीच्या आत लावली होती. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे प्रवेशद्वार जोरजोराने वाजविण्यास प्रारंभ केला. त्यावेळी तेथील कर्मचारी यांनी तो दरवाजा उघडला असता थेट महसूलचे वरिष्ठ अधिकारी समोर असल्याने त्याची बोलती बंद झाली. त्यांनी लागलीच येथे कर्तव्यावर असलेल्या परीचारिकेस याबाबत कल्पना दिली.
तहसिलदारांनी परीचारिकेस फैलावर घेत, येथे कामावर कोण डॉक्टर आहेत, अशी विचारणा केली. त्यांनी कोणी नाही म्हटल्यावर हजेरी रजिस्टरची मागणी केली. सदर परिचारिकेने ते डॉक्टरांकडे असते. डॉक्टर नाही, तेथे हजेरी रजिस्टर नाही म्हटल्यावर त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी परीचारिकेस डॉक्टरांनाला फोन लावण्यास सांगितले. फोनवर त्यांनी डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ करून, मला हजेरी नोंद पुस्तिका दाखवा असे दरडावले, असे तेथील परिचारिका सांगत असल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमात पसरली आहे.
या दरम्यान चालक सदर कृतीचे फोनमध्ये चित्रीकरण करत असल्याची कल्पना आल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांनी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात आपला मोर्चा वळवला. त्या ठिकाणीही त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना फैलावर घेतले. त्यांना हा गंभीर मामला लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना कळवून त्याकडे कानाडोळा केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार वैद्यकीय अधिकार्यांनी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ महुसल अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काय भुमिका घेणार? याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
या प्रकाराबाबत अहमदनगर येथील कर्मचारी संघटना व लिपिक हक्क परिषद तसेच मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत तहसीलदार विजय बोरुडे यांनी सामाजिक संकेतस्थळवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, आपण रोज पहाटे रस्ता भेटी, वाद विवाद भेटी नियमित करत असतो. त्या अनुषंगाने दि.25 फेब्रुवारी रोजी शहर व तालुका पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात भेटी दिली. सदर भेट ही रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी व कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी दिली असून यात कोणास काही चुकीचे वाटले किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.