कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा

शिर्डी दौर्‍यात स्नेहलता कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौर्‍यावर आले असता भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना पीक विमा कंपन्यांकडून 100 टक्के नुकसान भरपाई देणे, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर ड्रेनेजची व्यवस्था करणे आदींसह कोपरगाव तालुक्यातील पाणी, शेती, रस्ते आणि इतर प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून ते त्वरित सोडविण्याची मागणी कोल्हे यांनी केली.

यावर्षी अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीचे नियम-निकष बदलले आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ताबडतोब नुकसान भरपाई दिली. याबद्दल सौ. कोल्हे यांनी शासनाचे अभिनंदन केले. यावर्षी कोपरगाव मतदारसंघात प्रचंड पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील 13 हजार शेतकर्‍यांनी विमा उतरवून पीक विम्याचे हप्ते भरले.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असताना शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी 57 कोटी रुपये मिळायला हवे होते; परंतु विमा कंपन्यांकडून फक्त 1 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. विविध पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान भरपाई देऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यामध्ये शासनाने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना संबंधित पीक विमा कंपन्यांकडून 100 टक्के नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

समृध्दी महामार्गाचे कोपरगाव हद्दीतील काम अद्याप बाकी आहे. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे आसपासच्या शेतकर्‍यांचे यंदा खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. कोकमठाण हद्दीत समृध्दी महामार्गावरील डक अंडरग्राउंड केलेला असून त्याची उंची कमी असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतमालाची ने-आण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. ड्रेनेज व्यवस्था योग्यप्रकारे केलेली नाही. केलेले चर अतिशय अरूंद असून नळ्या टाकून पाणी जाण्याची केलेली व्यवस्था पूर्णत: कूचकामी ठरलेली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून काढणीस आलेली पिके शेतात सडून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या चराचे रूंदीकरण करून नव्याने सी. डी. वर्क करण्यात यावे, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल व त्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार नाही.

कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली आहे. ती अन्यत्र हलवून हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. ही प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. समृध्दीच्या कामासाठी खडी व इतर साहित्याची ने-आण करणार्‍या अवजड वाहनांमुळे अनेक रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व रस्ते समृध्दी महामार्ग व्यवस्थापनाने अगर ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशीही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही सौ. कोल्हे यांना दिली. सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com