कोपरगावात नगराध्यक्षाच्या भाषणामुळे वादाची ठिणगी

कोपरगावात नगराध्यक्षाच्या भाषणामुळे वादाची ठिणगी

तत्कालीन महिला अधिकारी व लोकप्रतिनिधींबद्दल तिरस्काराची भाषा वापरणार्‍या नगराध्यक्षांचा निषेध - वैशाली आढाव

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून देणार्‍या तत्कालीन महिला मुख्याधिकारी व कोपरगाव मतदार संघाला कोट्यवधी रूपयांचा निधी मिळवून देत विकास करणार्‍या माजी महिला लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात तिरस्काराची भाषा वापरून खिल्ली उडवल्याबद्दल विजय वहाडणे यांचा समस्त महिलांच्यावतीने जाहीर निषेध करीत असल्याचे भाजपच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव यांनी सांगितलेे.

सौ.आढाव म्हणाल्या नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या बदलीमुळे माझे वैयक्तीक मोठे नुकसान झाले. त्यांनी जाता जाता एखादा चांगला पुरुष अधिकारी कोपरगाव नगरपालिकेत पाठवावा. पण महिला अधिकारी आता नको. कारण यापुर्वीच्या महिला मुख्याधिकारी व माजी महिला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल मला खुप वाईट अनुभव आला आहे. तेव्हा काहीही झाले तरी आता महिला नको असेही म्हणत महिलांची खिल्ली उडवून समस्त महिलावर्गाचा व कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचा अवमान केला आहे. वहाडणे व्यक्तीगत राजकीय फायद्यासाठी स्वहीताची भूमिका बजावणारे आहेत. कर्तव्यदक्ष महिला अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना मानसिक त्रास देऊन त्यांचा अपमान नगराध्यक्ष वहाडणे यांनी केला. आणि आता पुन्हा जाहीरपणे त्या महिलांबद्दल विक्षिप्त वक्तव्य करून समस्त महिलांचा अवमान केल्याबद्दल वहाडणे यांचा तमाम महिलांच्यावतीने मी जाहीर निषेध करते. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबद्दल दीड कोटी रुपये मिळवून दिले तर सौ. कोल्हे यांनी शहरासाठी 40 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे निश्चितच योग्य नाही. मात्र त्या पैशाची बिले काढण्यासाठी सूत जुळलेल्या मुख्याधिकारी चांगला वाटला. त्यांच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष यांनी मुक्ताफळे उधळून अकलेचे तारे तोडले आहेत.

दोन्हीही महिला विकासकामे करीत असताना उलट नगराध्यक्ष वहाडणे यांनी त्यात खोडा घालण्याचे काम केले. व्यक्तीगत फायद्यासाठी महिलांचा अवमान करणे योग्य नाही. सुसंस्कारितआदर्श शिक्षिकेच्या पोटी वहाडणे जन्मलेले आहेत. त्या माऊलीचे विचारधन आपल्याला घेता आले नाही. नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलेल्या विकृत वक्तव्याचा जाहीर निषेध करत असल्याचे वैशाली आढाव यांनी म्हटले आहे.

मी महिलांना नेहमी सन्मानच दिला - नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे. माजी मुख्याधिकारी शिल्पाताई दरेकर याही कार्यक्षम होत्या यात शंकाच नाही. मी त्यांचा अवमान केलेलाच नाही. फक्त अनुभव सांगितले. माजी आमदार ताईंचा मला आलेला व येत असलेला कटु अनुभव कोपरगावकर रोज अनुभवतात. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माजी आमदारांनी कोपरगाव नगरपरिषदेला एक ढबूचाही निधी दिलेला नाही. दिला असल्यास तसे जाहिर करावे. त्याउलट त्यांनी नगरपरिषदेला माझ्या प्रयत्नातून मिळालेला 2 कोटी रुपये विशेष रस्ता निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला. तो मनमानी करून वापरला.त्यातील काही कामे 2 वर्षांपासून अपूर्ण आहेत. 40 वर्षे कोल्हे घराण्यात आमदारकी असतांना-नगरपरिषदेत सत्ता असतांनाही शहरात महिलांसाठी एकही स्वच्छता गृह का नाही? मी शहरात दोन ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह उभारले,तरी तेही कमीच आहेत असे स्पष्टिकरण नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिले.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, महिलांच्या मान सन्मानाबद्दल बोलण्याचा कोल्हे गटाला नैतिक अधिकार आहे का? तुमच्या अवतीभवती असलेल्या काहींचे किस्से अजूनही शहरात चर्चिले जातात. ईच्छा असल्यास मी त्यांची नावे घेऊनही ते किस्से सांगू शकतो.पण मला असे किळसवाणे राजकारण करायचे नाही. मी तर जागतिक महिला दिनानिमित्त दोन वेळा कोपरगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी महिलांना बसण्याचा मान दिला. त्यात कोल्हे गटाच्या नगरसेविकाही होत्या. आजही कोल्हे गटाच्या काही महिला नगरसेविकांचे पती किंवा सुपुत्रच नगरसेवक म्हणून वावरतात. आमदारपद गेले म्हणून कोल्हे गट राजकारणाची पातळी सोडून आरोप करत आहे. मी शहीद जवानांच्या वीर पत्नीच्या हस्ते दोन वेळा ध्वजारोहण केले. अनेक वेळा जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम महिलांच्या हस्तेच करत आहे. माझा वाढदिवस कोविडमुळे मृत झालेल्या सफाई कर्मचार्‍याच्या विधवा पत्नीचा सन्मान करून साजरा केला.अत्याचारित मुस्लिम भगिनीला दत्तक घ्यायचे मीच जाहिर केले.मृत वेश्यांच्या 4 अनाथ मुलींना मीच स्नेहालयात दत्तक घेऊन ठेवले. संजीवनी कारखान्यात किती महिलांना राखीव जागा ठेवून नोकर्‍या दिल्या. येसगाव पाटावर महिलांची विटंबना होत होती तेंव्हा तुम्ही त्याविषयी कधी बोलले का,त्यांना मदत केली का?जमलेच तर उत्तर द्या असे आवाहनही नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com